हटके

खरा ‘ टायगर ‘ ज्याने वाचवले होते २० हजार सैन्याचे प्राण 

Spread the love

          बॉलिवूड मध्ये बनणारे चित्रपट हे देशात घडलेल्या एखाद्या घटनेवर आधारित असतात. किंवा एखाद्या उपण्यासातील स्टोरिवर चित्रपटाचे कथानक असते. सध्या सलमान खान याचा ‘ टायगर 3 ‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. टायगर या नावावरून काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. भारतासाठी ‘ गुप्तहेर ‘  म्हणून काम करणाऱ्या रॉ एजंट रवींद्र कौशिक यांना तत्कालीन गृहमंत्र्यांनी  त्यांचा कामाची शैली ,वेग ,कौशल्य आणि चपळता पाहून ‘टायगर ‘ ही पदवी बहाल केली होती. सलमान यांच्या चित्रपटात खरा टायगर आणि चित्रपटातील कथानक यात तफावत असली तरी या चित्रपटाच्या माध्यमातून का होईना त्या खऱ्या ‘टायगर ‘ च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

सध्या  ‘ टायगर ‘ या चित्रपटाची प्रचंड हवा आहे, पण ही गोष्ट फार कमी लोकांना ठाऊक आहे की या चित्रपटातील अन् या स्पाय युनिव्हर्समधील ‘टायगर’ हे पात्र एका खऱ्या रॉ एजेंटवरुन प्रेरित आहे. अर्थात याचा दावा कोणत्याही चित्रपटात दिग्दर्शक किंवा लेखकाने केलेला नाही. सलमान खानचे ‘टायगर’ हे पात्र काल्पनिकच असल्याचं सगळीकडे नमूद करण्यात आलं आहे. शिवाय चित्रपटातील पात्र अन् खरा गुप्तहेर यांच्यातही बरीच तफावत आपल्याला आढळून येईन, पण तरी एक असा भारतीय गुप्तहेर होता ज्याचं टोपणनाव ‘टायगर’च होतं. आज त्याच्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत.

आपल्या देशाच्या या सगळ्यात मोठ्या गुप्तहेराचे नाव होते रविंद्र कौशिक. वेग, कौशल्य आणि चपळता पाहून रविंद्र यांना ‘टायगर’ हे नाव देण्यात आलं होतं. रविंद्र कौशिक यांचा जन्म राजस्थानमधील श्रीगंगापुरमध्ये ११ एप्रिल १९५२ मध्ये झाला. लहानाचे मोठे होत असताना त्यांनी १९६५ आणि १९७१ अशी दोन्ही युद्धं जवळून पाहिली, अनुभवली. कॉलेजमध्ये शिक्षण घेतानाच त्यांना नाटकाची आवड निर्माण झाली. १९७२ मध्ये एका नाटकात त्यांनी गुप्तहेराची भूमिका निभावली होती अन् यावेळीच ते काही गुप्तचर संस्थांच्या नजरेत आले. १९७३ मध्ये बी.कॉमचं शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी दिल्लीत येऊन दोन वर्षं रॉचं प्रशिक्षण घेतलं.

या प्रशिक्षणात त्यांनी पंजाबी आणि ऊर्दू या दोन्ही भाषा शिकल्या, याबरोबरच त्यांनी इस्लामबद्दल बरीच माहिती गोळा केली. १९७५ मध्ये त्यांनी पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून काम सुरू केलं, लाहोरच्या एका मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश मिळवला आणि तिथूनच ते गुप्तहेर म्हणून काम करत असत. स्वतःची ओळख लपवण्यात रविंद्र अत्यंत माहिर होते. काहीच दिवसांत त्यांनी पाकिस्तानी सैन्यात प्रवेश घेतला आणि पाहता पाहता मेजर या रॅंकपर्यंत पोहोचले. कोणाला त्यांच्यावर संशय येऊ नये यासाठी बटालीयनमधील एका अधिकाऱ्याच्या मुलीशी विवाह केला.

१९७९ ते १९८३ या दरम्यान रविंद्र यांनी बरीच माहिती भारताला पुरवल्याने आपण पाकिस्तानकडून होणाऱ्या बऱ्याच कारवाया थांबवू शकलो. अशारीतीने त्यांना ‘टायगर’ हे टोपण नाव आपल्या तत्कालीन गृहमंत्र्यांनी दिलं. याबरोबरच आयबीचे वरिष्ठ अधिकारी एम.के धर यांनी रविंद्र कौशिक यांच्यावर ‘मिशन टू पाकिस्तान’ नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकात त्यांनी कशारीतीने रविंद्र यांनी पाठवलेल्या माहितीमुळे तब्बल २०००० सैनिकांचे प्राण वाचले याबद्दल माहिती दिली आहे.

१९८३ मध्ये एका गुप्तहेरामुळेच रविंद्र यांचं बिंग फुटलं आणि ८ वर्षं पाकिस्तानच्या नाकाखाली काम करणाऱ्या रविंद्र यांना अटक करून सियालकोट सेंटरमध्ये पाठवण्यात आलं. इथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले, परंतु त्यांनी त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. १९८५ मध्ये त्यान मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली व त्यांची रवानगी मियांवाला जेलमध्ये करण्यात आली. आपल्या देशाबद्दल एकही शब्द न काढणाऱ्या या ‘टायगर’चा तुरुंगातच टीबी आणि हृदयरोगामुळे २००१ साली मृत्यू झाला अन् त्यांना न्यू सेंट्रल मुलतान तुरुंगात दफन करण्यात आलं. सलमानचा ‘टायगर’ आणि या खऱ्या खुऱ्या ‘टायगर’मध्ये फार अंतर आहे आणि खरं गुप्तहेरांचं विश्व हे फार वेगळं असतं हे यावरुन पुन्हा एकदा सिद्ध होतं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close