कॅबिनेट बैठकीत मतदार संघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी

खासदारांची संख्या आता ८५० वर जाईल
नवी दिल्ली/ विशेष प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटना सुधारणा विधेयक (Delimitation Bill) मंजूर झालं आहे. यामुळे लोकसभेतील खासदारांची संख्या ५० टक्क्यांनी वाढून ती ८५० वर जाईल.
यासोबतच २०२९ च्या लोकसभा निवडणुकीआधी महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू होईल. या दरम्यान सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे.
एप्रिलमध्ये सरकारनं लोकसभेत घटना दुरुस्ती विधेयक मांडलं होतं. पण विधेयकाच्या बाजूनं दोन तृतीयांश मतदान न झाल्यानं ते लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही. यानंतर आता भाजप प्रणित एनडीए सरकारनं विधेयक पुन्हा लोकसभेत मांडण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या आहेत. यावेळी लोकसभेत विधेयक मंजूर होईल, असा विश्वास भाजपच्या धुरिणांना आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत डिलिमिटेशनच्या माध्यमातून महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. या कायद्यात सगळ्या राज्यांमधील लोकसभेच्या जागा सरसकट ५० टक्क्यांनी वाढवण्याची तरतूद आहे. पुढील २५ वर्षे म्हणजेच २०५१ पर्यंत लोकसभेच्या जागा वाढवल्या जाणार नाहीत, अशीही तरतूद विधेयकात आहे.
घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी द्रमुकनं भाजप समोर २ अटी ठेवल्या होत्या. तमिळनाडूचं लोकसभेतील प्रतिनिधीत्त्व कायम राहावं आणि पुढील २५ वर्षे लोकसभेची सदस्य संख्या तितकीच राहावी, अशा दोन प्रमुख अटी द्रमुककडून सत्ताधाऱ्यांसमोर ठेवण्यात आल्या होत्या. या दोन्ही अटी भाजप प्रणित एनडीए सरकारनं मान्य केल्या आहेत. त्यामुळे द्रमुकच्या २२ खासदारांचा पाठिंबा विधेयकाला मिळू शकतो. तसं झाल्यास विधेयक मंजूर करून घेणं भाजपसाठी सोपं जाईल. लोकसभेत विधेयकाला ३६० खासदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. द्रमुकच्या पाठिंब्यानं सत्ताधारी ३३२ पर्यंत पोहोचू शकतात.




