विदेश

भर बाजरात ड्रोन हल्ला, १०० हून अधिक लोकांचा मृत्यू, 

Spread the love

मृतदेहाचा खच ,११३ पेक्षा जास्त गंभीर जखमी

सुदान/ नवप्रहार डेस्क

मागील काही दिवसांपासून सुदानमध्ये भीषण गृहयुद्ध सुरू आहे. आता या गृहयुद्धाने रक्तरंजित वळण घेतलं आहे. दक्षिण-पश्चिमी सुदानमधील दक्षिण दारफुर प्रांताची राजधानी असलेल्या न्याला मोठा हल्ला करण्यात आला आहे.

येथे सोमवारी सायंकाळी गजबजलेल्या बाजारावर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात १०० हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, ११३ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये महिला व लहान बालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मानवाधिकार संघटनेकडून हल्ल्याचा निषेध


या मानवी संहाराची गंभीर दखल घेत मानवाधिकार संघटना ‘इमरजेंसी लॉयर्स’ने एका निवेदनाद्वारे या भयंकर हल्ल्यासाठी थेट सुदानी सैन्याला जबाबदार धरलं आहे. अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या बाजाराला या हल्ल्याने अवघ्या काही क्षणांत सामूहिक हत्याकांडाच्या विदारक दृश्यात बदलून टाकल. आधीच युद्धाच्या झळा सोसत असलेल्या सामान्य नागरिकांच्या जगण्याचा संघर्ष या हल्ल्याने आणखी बिकट केला असल्याचे सांगत संघटनेने या प्रकरणाची तातडीने स्वतंत्र चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे.

आंतरराष्ट्रीय वैद्यकीय मदत संस्था ‘डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स’ (MSF) ने दिलेल्या माहितीनुसार, न्याला येथील त्यांच्या रुग्णालयात ३६ मृतदेह आणण्यात आले होते, तर आपत्कालीन (इमर्जन्सी) विभागात तब्बल १५० जखमींवर उपचार सुरू आहेत. सध्या दक्षिण दारफुरची राजधानी न्याला शहर अर्धसैनिक दल असलेल्या ‘रॅपिड सपोर्ट फोर्सेज’ (RSF) च्या नियंत्रणाखाली आहे. हे दल एप्रिल २०२३ पासून सुदानी लष्कराशी सशस्त्र संघर्ष करत आहे.

सुदानमधील गृहयुद्धामध्ये स्फोटकांनी सुसज्ज असलेल्या ड्रोनचा वापर झपाट्याने वाढला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सुदानी सेना आणि आरएसएफ या दोन्ही बाजूंनी अशा हल्ल्यांमध्ये कमालीची वाढ केली असून, यात शेकडो लोकांचा जीव गेला आहे. विशेष म्हणजे, यादरम्यान रुग्णालये, शाळा, धरणे, बाजारपेठा आणि विस्थापित नागरिकांचे मदत छावणी क्षेत्र यांसारख्या पूर्णपणे नागरी वस्तीच्या आणि सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे.

जगातील सर्वात मोठे मानवी संकट

एप्रिल २०२३ मध्ये सुदानी सेना आणि आरएसएफ यांच्यात खार्तूम येथून सुरू झालेला हा वाद आता संपूर्ण देशात पसरला आहे. या दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे सुदानमध्ये जगातील सर्वात मोठे मानवी संकट निर्माण झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, आज देशातील सुमारे ३.४ कोटी लोकांना तातडीने मदतीची गरज भासत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close