रूम नं. 101 अमित आणि नर्गिस फासावर लटकलेले मृतदेह,मॅनेजर चा पोलिसांना कॉल


दोघे मागील 20 दिवसांपासून याच खोलीत राहत होते
लखनऊ / विशेष प्रतिनिधी
लखनऊ च्या गेस्ट हाऊस मधील रुम नं.101 मध्ये एक जोडपे मागील 20 दिवसांपासून राहत होते. त्यामुळे गेस्ट हाऊस च्या मॅनेजरला दोघांबद्दल कुठलाही संशय आला नाही. पण अचानक त्या दिवशी रूम बॉय ला सकाळचे 10 वाजले तरी कुठलीच ऑर्डर मिळाली नसल्याने त्याला संशय आला. आणि त्याने या बद्दल मॅनेजरला कळवले. त्या दोघांनी सुरवातीला त्यांना आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला.पण आतून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दार तोडले असता दोघांचे मृतदेह फासावर लटकलेले आढळले. त्यामुळे या घटनेबाबत लगेच पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी रूम ची झडती घेतली असता त्यांना त्याठिकाणी एक मॅरेज सर्टिफिकेट आढळून आले. हे सर्टिफिकेट आर्य समाज मंदिराचे होते.आणि त्यात तरुणाचे नाव अमित तर तरुणीचे नाव नर्गिस उर्फ पूजा होते. त्यावरून पोलिस समजले की हा आंतरधर्मीय विवाह आहे.आणि पोलिसांनी आपल्या तपासाला सुरवात केली.
23 ऑगस्टला घेतली रूम
अमित आणि नरगिसने 23 ऑगस्टला राहण्यासाठी गेस्ट हाऊसची रूम नंबर 101 घेतली. जवळपास 20 दिवस दोघंही तिथे राहिले, त्यानंतर गेस्ट हाऊसचा मॅनेजर राकेश यादवने खोलीमध्ये तरुण-तरुणीचे मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेमध्ये सापडल्याचं पोलिसांना सांगितलं, यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी अमित आणि नरगिसचा मृतदेह खाली घेतला आणि हॉस्पिटलला पाठवला, यानंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. 23 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरदरम्यान रूम नंबर 101 मध्ये काय झालं? याचा तपास पोलीस करत आहेत.
हरदोईहून सुरू झाली कहाणी
अमित आणि नरगिस दोघंही हरदोई जिल्ह्याचे रहिवासी होते. अमित कुमारचं वय 22 होतं आणि तो हरपालपूरच्या अरवलपूर गावात राहत होता. अमितच्या वडिलांचं नाव ओमप्रकाश आहे. तर 19 वर्षांची नरगिस हरदोईच्या पालिया पंचशालाची रहिवासी होती. नरगिसच्या वडिलांचं नाव उस्मान होतं. हे दोघं लखनऊला पोहोचण्याआधी काय काय झालं? याची क्रोनोलॉजी पोलीस जोडत आहेत.
नरगिस बेपत्ता झाल्यानंतर हरपालपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये तिच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. नरगिस घरातून कधी निघाली आणि अमितच्या संपर्कात कशी आली आणि दोघं लखनऊला कसे पोहोचले? याचा शोध पोलीस घेत आहेत. अमित आणि नरगिस लखनऊला गेले असून त्यांनी लग्न केलं आहे आणि ते गेस्ट हाऊसमध्ये राहत आहेत, याबाबत दोघांच्या कुटुंबाला माहिती होती का? यादेखील तपासाचा विषय आहे.
रूममध्ये मिळालं मॅरेज सर्टिफिकेट
लखनऊच्या गेस्ट हाऊसमध्ये अमित आणि नरगिस राहत होते त्या रूम नंबर 101 मधून पोलिसांना मॅरेज सर्टिफिकेट मिळालं आहे. हे मॅरेज सर्टिफिकेट आर्य समाज मंदिराचं आहे, ज्यात अमित आणि नरगिसच्या लग्नाचा उल्लेख आहे. सर्टिफिकेटवर तरुणीचं नाव नरगिस उर्फ पूजा असं लिहिण्यात आलं आहे. हे सर्टिफिकेट कधी आणि कुठे बनवलं? दोघांचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं? कुटुंबाला या लग्नाची माहिती होती का? याची उत्तरं पोलीसही शोधत आहेत.
पोलिसांना रूममधून मिळाली नोट
पोलिसांना गेस्ट हाऊसच्या रूम नंबर 101 मधून एक नोटही मिळाली आहे, जो या केसमधील महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. पोलिसांनी या नोटमध्ये नेमकं काय आहे, याची माहिती अजून दिलेली नाही. रूमची बुकिंग कोणती कागदपत्र देऊन केली होती? दोघांनाही गेस्ट हाऊसवर भेटायला कोण कोण आलं होतं? त्यांच्या मोबाईल फोनवरून शेवटचं बोलणं कुणासोबत झालं होतं? मागच्या काही दिवसांमध्ये अमित आणि नरगिसने काय केलं? याचा शोधही पोलीस घेत आहेत. याशिवाय पोलिसांनी गेस्ट हाऊसच्या आसपासचं सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलं आहे.
फॉरेन्सिक टीम साईटवर
गेस्ट हाऊसच्या मॅनेजरने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी रूममधल्या सगळ्या महत्त्वाच्या वस्तू ताब्यात घेतल्या. ‘9 सप्टेंबरला रात्री लखनऊच्या चिनहट पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये तरुण आणि तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली, त्यानंतर पोलीस तिथे दाखल झाले आणि गळफास लागलेले दोन्ही मृतदेह खाली उतरवले गेले. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. घटनास्थळावरून मॅरेज सर्टिफिकेट आणि एक नोट जप्त करण्यात आली आहे’, असं डीसीपी दीक्षा शर्मा यांनी सांगितलं.




