पावसाने घेतली मोठी विश्रांती शेतकऱ्यांची धाकधुक वाढली

गेल्या 100 वर्षातील सर्वाधिक तिसरा कोरडा जून
विशेष प्रतिनिधी /पुणे
जून २०२६ मध्ये नैऋत्य मान्सूनने देशाच्या बहुतांश भागात वेळेत प्रवेश केला. पण मागील काही दिवसांपासून पावसाने मोठी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधुक वाढली असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.
यावर्षी मान्सूनचे आगमन आणि प्रत्यक्षात पडणारा पाऊस यात मोठी तफावत दिसून आली. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात देशातील तब्बल ७५ टक्के जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० ते १०० टक्क्यांपर्यंत कमी पाऊसझाला असून, हा जून गेल्या शंभर वर्षांतील तिसरा सर्वाधिक कोरडा जून ठरला आहे.
१ ते ३० जून २०२६ या कालावधीतील ७४१ जिल्ह्यांच्या विश्लेषणानुसार, २२३ जिल्ह्यांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक पावसाची तूट, तर ३३२ जिल्ह्यांमध्ये २० ते ५९ टक्के कमी पाऊस नोंदविण्यात आला. म्हणजेच, एकूण ५५५ जिल्ह्यांमध्ये पावसाची गंभीर तूट होती. याउलट, केवळ १८१ जिल्ह्यांमध्येच सामान्य किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाला.
राष्ट्रीय स्तरावर जून महिन्यात १५७.७ मिमी एवढा सरासरी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ९२.२ मिमी पाऊस झाला. त्यामुळे जून २०२६ हा २००९ आणि २०१४ नंतरचा शतकातील तिसरा सर्वाधिक कोरडा जून ठरला
पावसाची तूट सर्वाधिक मध्य भारतात (५९ टक्के) आढळली. सोयाबीन व कडधान्यांचे प्रमुख उत्पादन क्षेत्र असलेल्या या भागातील कमी पावसाचा परिणाम खरीप हंगामावर होण्याची शक्यता आहे. पूर्व व ईशान्य भारतात ४१ टक्के, दक्षिण द्वीपकल्पात २८ टक्के, तर उत्तर-पश्चिम भारतात २२ टक्के पावसाची तूट नोंदली गेली.
राज्यनिहाय पाहता, गुजरातमधील ८५ टक्के जिल्हे ‘मोठी तूट’ या श्रेणीत होते. छत्तीसगडमधील ७० टक्के जिल्ह्यांमध्ये गंभीर पावसाची कमतरता दिसून आली. जगातील सर्वाधिक पर्जन्यमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेघालयातील ९१ टक्के जिल्ह्यांमध्येही पावसाची मोठी तूट नोंदली गेली
तज्ज्ञांच्या मते, मान्सूनचे आगमन म्हणजे जलसुरक्षेची हमी नाही. पाऊस कोठे, केव्हा आणि किती पडतो, यावर शेती, जलाशयांतील पाणीसाठा, भूजल पुनर्भरण, शहरांचा पाणीपुरवठा आणि अन्नधान्याच्या किमती अवलंबून असतात. त्यामुळे जून २०२६ ने केवळ पावसाचा नव्हे, तर देशाच्या जलसुरक्षेचा गंभीर इशारा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकूण जिल्हे – ७४१
६०% पेक्षा अधिक तूट – २२३ जिल्हे
२० ते ५९% तूट – ३३२ जिल्हे
सामान्य किंवा अधिक पाऊस – १८१ जिल्हे
जूनमधील प्रत्यक्ष पाऊस – ९२.२ मिमी
जूनचा सरासरी पाऊस – १५७.७ मिमी


