कथित प्रियकराकडून गरोदर प्रेयसीची हत्या

एमसोनी गणेश रामपुरे (वय १९, रा. अलकुंटे चौक, सोलापूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेत तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला आहे. सोनी रामपुरे हिचे लग्न वर्षापूर्वी झाले असून, तिचे सासर मोदी परिसरात आहे. बापू सुरेश आरगोळ (वय 26 वर्षे, रा. उत्तर सदर बाजार, सोलापूर शहर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मयत सोनीच्या आई लक्ष्मी राम म्हेत्रे (वय 55 वर्षे, रा अलकुंटे चौक, उत्तर सदर बाजार सोलापूर) यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
प्रेयसीचं लग्न दुसरीकडे झाल्याचा राग
मयत सोनी आणि बापू आरगोळ यांचे प्रेमसंबंध होते, मात्र बापू आरगोळ यांच्या भावाने लग्न लावून देण्यास नकार दिला होता. बापू आरगोळ सोबत सोयरीक न झाल्याने लक्ष्मी म्हेत्रे यांनी वर्षभरापूर्वी मुलगी सोनीचं लग्न दुसरीकडे लावून दिलं होतं. याचाच राग मनात धरून बापू आरगोळ याने रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून लक्ष्मी म्हेत्रे यांना धक्काबुक्की केली आणि नऊ महिन्याच्या गर्भवती सोनीचा तोंड दाबून, गळा आवळून तिचे केस धरून, भिंतीवर डोके आपटून खून केला. दुर्दैवाची बाब म्हणजे सोनीच्या पोटातील बाळाचा देखील मृत्यू झाला आहे. एका गर्भवती महिलेचा व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.
संशयित आरोपीने जाणूनबुजून भांडण काढले
फिर्यादी लक्ष्मी म्हेत्रे यांची मुलगी सोनी ही डिलिव्हरीसाठी माहेरी आली होती. लक्ष्मी म्हेत्रे आणि सोनी रामपुरे हे रविवारी 19 एप्रिल रोजी सायंकाळी घराच्या बाहेर बसले होते. लक्ष्मी म्हेत्रे यांच्या घरासमोर राहणारा संशयित आरोपी बापू आरगोळ याने घरातील साऊंडवर मोठ्याने गाणे लावून गल्लीतील लहान मुलांसोबत नाचत व गोंधळ घालत होता. लक्ष्मी म्हेत्रे यांनी आरोपीस माझी मुलगी नऊ महिन्याची गरोदर असून तिला धक्का लागेल, तू साऊंड बंद करून नाच गाणे व गोंधळ घालणे बंद कर असे म्हणाले होते.
दोन जीव गेल्याने हळहळ
मृत सोनी ही गर्भवती होती. त्यामुळे या घटनेत तिच्यासोबतच तिच्या गर्भातील बाळाचाही अंत झाला आहे. अवघ्या एका वर्षापूर्वी विवाह झालेल्या तरुणीचा अशा प्रकारे खून झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सदर बझार पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.




