शिक्षिकेने भर वर्गात विद्यार्थिनीला विचारला पाळी आल्याचा पुरावा अन्….

हैदराबाद / विशेष प्रतिनिधी
हैदराबाद येथील मलकाजगिरी मधील शासकीय ज्युनिअर कॉलेज मधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथील एका शिक्षिकेने वर्गात उशिरा पोहचलेल्या विद्यार्थिनीला पाळी आल्याचा पुरावा मागितल्याने भर वर्गात सगळ्यांसमोर झालेल्या अपमानाने खचलेली तरुणी नैराश्यात गेली आणि मानसिक ताण आल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांनी संबंधित शिक्षकांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेने गुरु-शिष्याच्या पवित्र नात्यावर आणि शिक्षण व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायली (बदलेलं नाव ) ही नेहमीप्रमाणे कॉलेजला जायला निघाली, मात्र त्या दिवशी तिला इतर दिवसांपेक्षा जास्तच उशीर झाला. वर्गात शिक्षक आधीच उपस्थित होते. शिवाय शिक्षिकेने मुलांना शिकवायला सुरुवात देखील केली होती. याच वेळेस सायलीने वर्गात प्रवेश केला. सायलीला उशीर झाल्याचे कळताच वर्गात उपस्थित शिक्षिका तिच्यावर भडकल्या.
शिक्षिकेने तिला “इतका उशीर का झाला ? तुला परियड्स आले असतील तर पुरावा दाखव, नाटक करू नकोस”अशी अपमानास्पद वागणूक दिली. त्यानंतर सायली घाबरली ती ढसा ढसा रडत वर्गाच्या बाहेर पडली. हा सगळा प्रकार चालू वर्गात विद्यार्थ्यांसमोर घडल्याने सायलीला वाईट वाटले. ती कॉलेजमधूनच घरी परतली. घरी परतल्यानंतर देखील तिची प्रकृती ठीक नसल्याचं तिच्या आईने सांगितलं.
यानंतर ती नैराश्यात गेली होती आणि वारंवार त्या अपमानास्पद वागणूक तिला आठवत होती. मनावर आलेल्या ताणामुळे संध्याकाळी ती अचानक घरात बेशुद्ध होऊन पडली. घाबरलेल्या पालकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. प्रचंड मानसिक धक्क्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असावा, असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र सविस्तर अहवाल अद्यापही आलेला नाही. याप्रकरणी सायलीच्या पालकांनी संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.




