रोशन कुडे याचा गौप्यस्पोट किडनी स्पॅम मध्ये आणखी पाच तरुणांचा समावेश

चंद्रपूर / विशेष प्रतिनिधी
कर्ज फेडण्यासाठी चक्क किडनी विकणाऱ्या शेतकरी रोशन कुडे यांनी एक गौप्यस्पोट केला आहे. त्यांच्या मते त्यांनी एकट्यानेच किडनी विकली नाही तर त्याच्या सोबत या प्रक्रियेत आणखी काही तरुणांचा समावेश होता. त्याच्या या माहिती नंतर पोलिस विभाग आणखी सक्रिय झाला आहे. या मागे मानवी अवयव तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा पोलिसाना संशय आहे. आणि त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, पंजाब आणि बिहारमधील तरुणांचा यामध्ये समावेश आहे. किडनी विकावी लागणारा शेतकरी रोशन कुडे यानेच प्रसारमाध्यमांशी बोलताना आज ही माहिती दिली. कंबोडियात ‘किडनी स्पॅम’ चालत असल्याचेही त्याने सांगितले.
चंद्रपूरमधील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे याने किडनी विकल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आपल्याप्रमाणेच आर्थिक संकटात असल्यामुळेच या तरुणांनी किडनी विकल्याचे त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. नाशिक येथील एक व्यक्ती यावेळी सोबत होता, असे तो म्हणाला. त्याने आधी किडनी देण्यास होकार दिला, मात्र नंतर नकार देत कोलकाता विमानतळावरून घरी परतल्याचे तो म्हणाला. दुग्ध व्यवसायासाठी आपण कर्ज घेतले होते, पण गायी मरण पावल्या आणि नुकसान झाल्याने कर्जात बुडत गेल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, हे प्रकरण बेकायदा सावकारीतून आंतरराष्ट्रीय मानवी अवयव तस्करीच्या दिशेने जात असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली आहेत.
मोठय़ा रॅकेटचा समावेश
कंबोडियात जाऊन किडनी विकणे ही काही एकट्याचे काम नाही. यात एखादे रॅकेट सक्रिय असल्याची दाट शक्यता असून त्यादिशेने तपास सुरू आहे. शेतकऱ्याने सांगितलेल्या प्रत्येक राज्यात पथक जात आहे. जे पाच जण रोशन कुडे यांच्यासोबत कंबोडियाला गेले होते त्यांच्याशीही संपर्क साधला जाणार असल्याचे चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले.
तपासासाठी‘एसआयटी‘ स्थापन
रोशन कुडेने उघड केलेल्या धक्कादायक माहितीमुळे कंबोडियात ‘किडनी स्पॅम’ चालत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात आणि पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली हे पथक काम करणार असून अवयव तस्करीबाबत तपास करणार आहे.




