कडू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईला जाणार

नागपूर /प्रतिनिधी
शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा ७/१२ कोरा करावा यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकार विरोधात मागील काही महिन्यांपासून रान पेटवले आहे. पहिले अन्नत्याग आंदोलन, नंतर पायी यात्रा आणि आता ट्रॅक्टर महाएल्गार यात्रा काढून कडू यांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी बाध्य करण्याचे प्रयत्न चालविले आहे.
ते आपल्या लाखो कार्यकर्त्यांसह नागपूरच्या जामठा येथे सरकार विरोधात शडू ठोकून आंदोलन करत आहेत. यामुळे शहरातील महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले होते.
यामुळे काहीजण 12 तास बसमध्ये अडकले, तर काहींच्या महत्त्वाच्या मुलाखती आणि विमाने चुकली. या गंभीर स्थितीची दखल घेत नागपूर खंडपीठाने बुधवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महामार्ग मोकळा करण्याचे आदेश दिले होते. सरकारने गृहराज्यमंत्री पंकज भोयर व अर्थराज्यमंत्री आशीष जयस्वाल यांना आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पाठवले, पण ते उशिरा पोहोचले. यामुळे आंदोलकांनी पोलिसांना अटक करण्याची विनंती केली. अखेर राज्यमंत्र्यांच्या आगमनानंतर बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चेची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी मुंबईत बोलावले असून आज Bacchu Kadu हे या चर्चेसाठी मुंबईत येणार आहे. काही वेळातच ते नागपूरहून मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता आहे.
‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’मुळे नागपूर-हैदराबाद व नागपूर-जबलपूर महामार्गांवरील वाहतूक बुधवारी सायंकाळपासून पूर्णपणे थांबली होती. नागरिकांना शहरात येण्यासाठी पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागला. या आंदोलनामुळे नागपूरकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अशातच आंदोलक स्वतःला अटक करून घेण्यासाठी पुढे सरसावल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
राज्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याची आणि चर्चेतून मार्ग काढण्याची विनंती केली. या चर्चेत राजू शेट्टी, डॉ. अजित नवले, वामनराव चटप, खा. अमर काळे, महादेव जानकर, रवी तुपकर यांसारखे शेतकरी नेते सहभागी झाले होते. आंदोलकांना भीती होती की चर्चेसाठी गेल्यास त्यांचं आंदोलन दडपलं जाईल. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणावी, अशी मागणी केली.
सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी आणि महसूलमंत्र्यांशी आंदोलकांची फोनवरून चर्चा घडवून आणली. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना आज चर्चेसाठी मुंबईत बोलावलं असून बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडून ‘आम्ही चर्चेसाठी मुंबईला गेलो तरी नागपुरातील आंदोलन दडपलं जाणार नाही’ असा शब्द घेतला. पंकज भोयर यांनी शांततामय मार्गाने आंदोलन केल्यास आंदोलकांना त्रास दिला जाणार नाही, असं आश्वासन दिलं आहे.
दरम्यान, सरकारच्या चर्चेनंतर बच्चू कडू यांनी आंदोलकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘आपली एक मागणी नाही, तर 25 मागण्या आहेत. त्यासाठी मुंबईला जाणं गरजेचं आहे. चर्चेतून प्रश्न सुटतात. आपण चर्चेला गेलो म्हणजे आपले आंदोलन संपलं असं नाही. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली नाही, तर सुरू असलेले हे आंदोलन अधिक आक्रमक करू. 31 तारखेला रेल्वेच्या रुळावर जाऊन बसू’, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
 
					 
					
 
					

