पोलिसांनी तरुणाला इतक्या क्रूरतेने मारले की रक्त धमन्या फुटुन झाला मृत्यू

तीन दिवसांनी चढणार होता नोकरीवर
मारहाण केल्यावर प्रकरण मिटविण्यासाठी १० हजाराची मागणी
भोपाळ / प्रतिनिधी
नोकरी लागल्याच्या आनंदात मित्रासोबत पार्टी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी इतक्या क्रूरतेने मारहाण. केली की त्याच्या रक्त धमन्या फुटल्या. आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मारहाणी नंतर प्रकरण मिटविण्यासाठी पोलिसांनी १० हजाराची मागणी केल्याचा आरोप मृत अभियंता तरुणाच्या मित्रांकडून करण्यात आला आहे. या मारहाणीचा vdo सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
२१ वर्षीय अभियंताचा पोलिसांच्या मारहाणीत जीव गेला आहे. उदित गायकी नावाच्या तरुणाला दोन पोलिसांनी बेदम मारहाण केली, यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने अनेकांना धक्का बसला असून पोलिसांच्या काम करण्याच्या पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
उदितने नुकतेच अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि त्याला ८ लाख रुपयांच्या पॅकेजसह बंगळुरूमध्ये नोकरी मिळणार होती. तो अवघ्या तीन दिवसांनी होणाऱ्या मुलाखतीसाठी कागदपत्रे घेण्यासाठी भोपाळला आला होता. गुरुवारी रात्री तो त्याच्या मित्रांसोबत पार्टी करत असताना पिपलानी पोलिस ठाण्यात तैनात असलेले कॉन्स्टेबल संतोष बामनिया आणि सौरभ आर्य दुचाकीवरून आले. त्यांनी उदितला गाडीतून बाहेर काढले. घाबरून उदित याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण एका पोलिसाने त्याला पकडले आणि दुसऱ्याने त्याला काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाणीमुळे रक्तवाहिन्या फुटल्यामुळे मृत्यू
मारहाणीनंतर उदितची प्रकृती बिघडली. त्याला सतत उलट्या होऊ लागल्या. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण, एम्समध्ये पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डीसीपी विवेक सिंह यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालातून उदितचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला नाही तर क्रूर हल्ल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ल्यादरम्यान, त्याच्या स्वादुपिंडाला गंभीर दुखापत झाली, यामुळे त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी मारहाणीनंतर १० हजार रुपये मागितले
दरम्यान, उदितच्या मित्रांनी आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे. उदीतला मारहाण केल्यानंतर दोन्ही पोलिसांनी प्रकरण मिटवण्यासाठी त्यांच्याकडून १०,००० रुपये मागितले. या घटनेनंतर, संतोष बामनिया आणि सौरभ आर्य या दोन आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. उदित हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील राजकुमार एमपीईबीमध्ये अभियंता आहेत आणि त्याची आई शिक्षिका आहे.