असे काय केले आयएएस अधिकाऱ्याने की त्याला कार्यालयाबाहेर पडण्यासाठी मागवावी लागली पोलिस कुमक

कच्छ (गुजरात ) / विशेष प्रतिनिधी
आयएएस अधिकाऱ्याच्या रुबाब वेगळा असतो. त्यांना समाजात कसे वावरावे आणि कसे वागावे याची सुद्धा जाण असते. पण काही वेळा हे अधिकारी शहाणपणा करतात.आणि तोच त्यांच्या अंगलट येतो.असाच प्रकार एका अधिकाऱ्यासोयात घडला आहे.
या अधिकाऱ्यांच्या अंहकारामुळे मोठे नाट्य घडते. आयएएस अधिकाऱ्यांना कधी कधी जनतेचा सूर कळत नाही आणि नाडी हाती लागत नाही असं म्हटल्या जाते.याचा प्रत्यय गुजरातमध्ये नियुक्ती झालेल्या या आयएएस अधिकाऱ्याला आला. त्याच्या एका कृतीवरून मोठा राडा झाला. थेट पोलिसांनाच पाचरण करावे लागले. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
गुजरातमधील कच्छ हा सीमावर्ती आणि राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. येथे आयएएस उत्सव गौतम यांच्यावर डीडीओची मोठी जबाबदारी आहे. उत्सव यांचा अतिउत्साह त्यांच्या चांगलाच अंगलट आल्याचे समोर आले. मांडवी तहसील अंतर्गत एक लोकप्रतिनिधी भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहचले. पण आयएएस उत्सव गौतम यांनी त्यांना थेट
‘गेट आउट’ म्हटले.
कोणतेही सबळ कारण न देता अशा प्रकारे अपमान केल्याने या नेताजीचा जीव खजील झाला. हाहा म्हणता म्हणता ही बाब तालुक्यात पसरली. मग काय त्यांचे कार्यकर्ते, चाहत्यांनी डीडीसी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरु केले. जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. माणसांची कुमक काही केल्या कमी होईना. संध्याकाळ होत आल्यावर आयएएस उत्सव गौतम यांना कार्यालयाबाहेर पडण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा मागवावा लागला. याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांनी त्यांना माणुसकीचे धडे शिकवणे गरजेचे असल्याचा सल्ला दिला.
कोण आहेत आयएएस उत्सव गौतम?
गौतम उत्सव 2018 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्यांची जिल्हा विकास अधिकारी म्हणून खास नियुक्ती करण्यात आली आहे. ते मुळचे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहिवाशी आहे.आयआयटी पाटणा येथून त्यांनी बीटेक केलेले आहे. युपीएससी परीक्षेत ते 33 व्या रँकवर होते. त्यांची जिल्हा विकास अधिकारी म्हणून फेब्रुवारी 2025 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी ते अमरेली जिल्ह्यात होते. ते चौथ्या प्रयत्नात प्रशासकीय अधिकारी झाले. त्यांनी बीटेकनंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी केली. पण ती सोडून प्रशासकीय सेवेत आले. पण कच्छमधील त्यांच्या वर्तनावर स्थानिक नाराज झाले आहेत.