अवघ्या ४ चेंडूत संपला T 20.सामना ; १० विकेट्स ने मिळविला विजय

क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटल्या जाते. कारण सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. सामन्याच्या निकाल कधीकधी शेवटच्या चेंडूवर लागतो. पण एक सामना असा झाला ज्याचा निकाल अवघ्या ४ चेंडूत लागला. आणि पुढच्या संघाने एकही विकेट न गमावता सामना जिंकला.
एशियन क्रिकेट काऊन्सिलच्या अंडर-१६ झोनमधील एका सामन्याचा निकाल अवघ्या ४ चेंडूत लागला.एसीसी पुरुषांच्या अंडर-१६ ईस्ट झोन कपमध्ये हाँगकाँग-चीन अंडर१६ आणि मालदीवच्या अंडर-१६ संघांमध्ये विक्रमी सामना पाहायला मिळाला. हाँगकाँग-चीनसाठी हा सामना खूप लवकर संपला. संघाने प्रथम फलंदाजी करत फक्त चार चेंडूत सामना जिंकला. खरं तर, हाँगकाँग-चीनने मालदीवने दिलेलं लक्ष्य एकही विकेट न गमावता फक्त ४ चेंडूत पूर्ण केलं. संघातील सर्व खेळाडूंनी शानदार कामगिरी करत विजय नोंदवला. मालदीवचे ७ फलंदाज शून्यावर या सामन्यात बाद झाले.
अवघ्या ४ चेंडूत या संघाने जिंकला सामना
प्रथम फलंदाजी करताना मालदीवचा संघ १७ षटकांत अवघ्या २० धावांवर गारद झाला. संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कर्णधार हमद हुसेन होता. हमद हुसेनने त्यांच्या संघाकडून ६ धावा केल्या तर सलामीवीर सादिकीन बावा मोहम्मद शिफान दोन धावा काढून बाद झाला. युसूफ फयल फैसल एक धाव करत बाद झाला. तर नेहल मोहम्मद अब्दुल्लाहने तीन धावा केल्या. संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे चार फलंदाजांनी आपले खाते तरी उघडले, परंतु उर्वरित ७ खेळाडू शून्यावर बाद होत पॅव्हेलियनमध्ये परतले.
मालदीव संघाला चार धावांवर पहिला धक्का बसला आणि त्यानंतर ८ धावांवर दोन विकेट्स संघाने गमावले. १३ धावांवर पुढील दोन विकेट तर दोन फलंदाज १४ धावांवर बाद होत माघारी परतले. सातवा आणि आठवा विकेट १६ धावांवर पडला तर शेवटचे दोन विकेट २० धावांवर पडले. हाँगकाँग-चीन संघाकडून आरव खदेरियाने २.५ षटकांत एक धाव देत चार विकेट्स घेतल्या. त्याने एक मेडन ओव्हरही टाकली. इतकंच नाही तर हरिशंकर वेंकटेश आणि प्राण विमल कलाथिया यांनी ३-३ विकेट्स घेतल्या. हाँगकाँग-चीन संघाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत ऐतिहासिक विजय नोंदवला.
मालदीवने दिलेल्या २१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या हाँगकाँग-चीन संघाने अवघ्या चार चेंडूत सामना जिंकला. संघाकडून यष्टीरक्षक श्रेय निलेशकुमारने ५०० च्या स्ट्राईक रेटने दोन चौकार आणि दोन षटकारांसह चार चेंडूत २० धावा केल्या. त्याचा सहकारी युआन टॅनला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. मालदीवकडून कर्णधार हमद हुसेनने हे षटक टाकले. त्याने या षटकात दोन वाईड चेंडू टाकले, ज्यामुळे हाँगकाँग-चीन संघाचा विजय अधिक सोपा झाला.