पोलिसांनी घेतली नाही तक्रार आता तो झाला पोलिस अधिकारी

यशोगाथा …… सलाम त्याच्या जिद्दीला !!
निकाल आला तेव्हाही तो चारत होता मेंढ्या
कोल्हापूर /विशेष प्रतिनिधी
एखाद्या वेळेस एखादी गोष्ट मनाला इतकी खटकते की त्याचे शल्य माणसाला नेहमी बोचत राहते. काही लोक याला दुर्भाग्य समजून विसरतात . तर काही लोक त्यांच्या सोबत झालेल्या व्यवहारातून काहीतरी शिक घेऊन जगासमोर आदर्श बनण्याचा निर्धार करतात आणि त्यासाठी मग वाट्टेल ती मेहनत आई वाट्टेल ती किंमत मोजायला तयार होतात.
कोल्हापूरच्या युपीएससी (UPSC) क्रॅक केलेल्या बिरदेव डोणेची कथा ही अशीच आहे. ज्या बिरदेव ढोणेची पोलिसांनी साधी तक्रारही घेतली नाही, तो बिरदेव डोणे आज आयपीएस अधिकारी बनलाय.
सरफरोश सिनेमात आमीर खान एका मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती असून त्याच्या वडील व भावाला काही गुंडांकडून मारहाण झालेली असते. आपल्यावरील या अन्यायाची तक्रार देण्यासाठी आमीर खान पोलीस स्टेशनला जातो, पण पोलिस त्याला कसलीही दाद देत नाहीत. व्यवस्थेबदलचा हा संताप त्याच्या मनाला चटका देतो आणि पुढे आमीर खान आयपीएस अधिकारी बनतो, एसीपी राठोड बनून तो कित्येक पोलिसांचा साहेब बनतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील बिरदेण ढोणेच्या यशातही अशाच कित्येक संघर्षमय गोष्टींचा साठा आहे. युपीएससी परीक्षेतून आज आयपीएस झाल्यानंतर त्याने आयुष्याचा खडतर प्रवास सांगितला, त्यातील एक घटना ही आमीर खानच्या सरफरोश सिनेमातील दृश्याप्रमाणेच म्हणता येईल. ज्या पोलिसांनी बिरदेवची तक्रार घेतली नाही, तो बिरदेव आता आयपीएस अधिकारी बनला आहे.
फोन चोरीला गेला, पोलिसांना भावच नाही दिला
युपीएससीची मुलाखत दिल्यानंतर ज्ञानप्रबोधिनी येथील अभ्यास केंद्रावरुन जात असताना रात्री 11 वाजता राधिका भेळ येथून माझा फोन चोरीला गेला. माझा फोन चोरीला गेला ही गोष्ट मी अद्यापही घरी सांगितली नाही. घरी सांगितलंय की माझा फोन बंद पडलाय. पण खरं तर माझा फोन चोरीला गेलाय. त्यामुळे, आजही माझ्या बीडच्या मित्राचा फोन मी वापरत आहे, असे बिरदेवने सांगितले. तसेच, फोन चोरीला गेल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तेव्हा त्यांनी आम्हाला भावच नाही दिला, माझी तक्रारही घेतली नाही, असे बिरदेवने एका मुलाखतीत बोलताना सांगितले.
निकाल लागला तेव्हाही तो मेढ्याच चरत होता
कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलाने युपीएससी क्रॅक करुन लाखो गरिब, वंचित आणि सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांपुढे आदर्श निर्माण केलाय. गावखेड्यातील विद्यार्थ्यांच्या आशेचा किरण तो बनलाय. बिरदेव सिद्धापा ढोणे असं त्याचं नाव असून यूपीएससी परीक्षेत त्याने देशात 551 वा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगावमधील अथणीमध्ये मेंढ्या घेऊन गेला होता. वाड्या-वस्त्यावर, माळरानावर जाऊन शिकलेला बिरदेव आता देशसेवत आपलं योगदान देणार आहे. त्याच्या या निवडीनंतर सर्वच स्तरातून त्याचा सत्कार, सन्मान केला जात आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच संघर्षगाथा बिरदेवची आहे.