तिने कुत्र्यासाठी केले 19 लाख रूपये खर्च

लोकांना कुत्रे, मांजर , पोपट यारखे पाळीव प्राणी पाळण्याची सवय असते. लोकं प्राण्यांवर कुटुंबीयासारखे प्रेम करतात. त्यामुळे या प्राण्यांसोबत अश्या लोकांचा लळा लागतो. काही लोक तर या प्राण्यांना सोबत घेऊन देखील झोपतात. यामुळे असे पाळीव प्राणी कुटुंबातील सदस्य होऊन बसतात. ते मेले की मग त्यांच्या मालकाना कुटुंबातील सदस्य गेल्याप्रमाणे दुःख होते. एका महिलेचा पाळीव कुत्रा मेल्यावर ती फारच बेचैन झाली. आणि तसाच कुत्रा मिळवण्यासाठी तिने 19 लक्ष रुपये खरचले.
घटना चीन मधील आहे. येथील एका महिलेचं तिच्या पाळीव कुत्र्यावर खूप प्रेम होतं, त्यामुळे त्या कुत्र्याच्या जाण्याचा तिला खूप मोठा धक्का बसला. शांघायमध्ये राहणाऱ्या या महिलेने आपल्या पाळीव कुत्र्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी तब्बल 19 लाख रुपये खर्च केले. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, हे कसं शक्य आहे? चला, जाणून घेऊया या महिलेने हा चमत्कार कसा केला.
लाडक्या कुत्र्याच्या मृत्यूने बसला धक्का
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, शांघायमधील हांगझोऊ येथे राहणाऱ्या ‘शू’ नावाच्या महिलेने 2011 मध्ये एक डोबरमन कुत्रा विकत घेतला. तिने त्याचं नाव ‘जोकर’ ठेवलं आणि ती त्याच्यावर खूप प्रेम करायची. ती एकटी राहत असताना, जोकरमुळे तिला सुरक्षित वाटायचं आणि त्यांचं नातं खूप खास होतं. पण, 9 वर्षांचा असताना जोकरच्या मानेला कर्करोग झाला. महिलेने त्याची शस्त्रक्रिया केली, जी जोकरने धैर्याने सहन केली. 11 वर्षांचा झाल्यावर, जोकरला हृदयविकाराचा झटका आला आणि तो मरण पावला. जोकरच्या मृत्यूमुळे महिलेला मोठा धक्का बसला.
19 लाख रुपये खर्चून कुत्र्याला पुन्हा जिवंत केलं
पण, महिलेने हार मानली नाही आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार, तिने आपल्या जोकर कुत्र्याच्या क्लोनिंगची प्रक्रिया अवलंबली. तिने क्लोनिंग करणाऱ्या कंपनीचं नाव सांगितलं नाही, पण शास्त्रज्ञांनी जोकरच्या पोट, कान आणि डोक्याच्या त्वचेचे नमुने घेऊन त्यातून भ्रूण तयार केलं. ते एका सरोगेट कुत्र्यामध्ये प्रत्यारोपित केलं आणि त्यावर लक्ष ठेवलं. 2024 मध्ये, जोकरचा क्लोन तयार झाला, ज्याचं नाव ‘लिटल जोकर’ ठेवण्यात आलं. महिला सांगते, तो अगदी जोकरसारखाच वागतो.