अखिल मानवमात्रांची गायत्री जगद्गुरु ची गाथा – श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.

बाळासाहेब नेरकर कडून
मनुष्येत्तर प्राणी ही केवळ भोग योनी असल्याने वेदत्रयीची नियमावली त्यांना लागू पडत नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाअभावी आत्मोद्धाराच्या साधनेला कुठलाही वाव नाही. दुर्मिळ असणाऱ्या मनुष्य योनीमध्ये मात्र आहार , निद्रा , भय व मैथूनाव्यतिरिक्त भगवंतानी प्रदान केलेल्या ज्ञानाधिक्यामुळे तो व्यक्तिगत तथा सामूहिक साधनेद्वारा स्वतःसह इतरांच्याही उद्धाराचा मार्ग प्रशस्त करू शकतो. म्हणून सामूहिकरीत्या जिचे गान केले असता जी वर्णाश्रम तथा उचनिचत्विचा भेद न करता सर्वांना समर्थपणे तारू शकते अशी अखिल मानव मात्रांची गायत्री म्हणजेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा असल्याचे निष्ठापूर्वक मत भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
ते आज श्री संत वासुदेव जी महाराज अवतीर्णोत्सव मूर्तीप्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचे औचित्य साधून सालाबाद आणि याही वर्षी श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे आयोजित असणाऱ्या सामूहिक गाथा पारायण व प्रवचन सप्ताहातील प्रथमपुष्पगुंफीत असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा ही मानवी जीवनाची आजीवन आदर्श आचारसंहिता असून तद्नुसार जीवन जगणाऱ्या व्यक्तिमत्वाकडे सर्वसामान्य माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. अर्थातच तो व्यक्ती संसारिक क्षेत्रामध्ये जरी कार्यरत असला तरी त्याला लोक साधू वा सत्पुरुष म्हणूनच सन्मान देत असतात. एकूणच गाथा हे वाल्याचा वाल्मीक ऋषी बनवून , सामान्याला सत्पुरुषत्वापर्यंत पोहोचविण्याची गुरुकिल्ली आहे. असे अनेक उदाहरणे देऊन बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या श्रोतेमंडळी समोर महाराजांनी गाथेचे महत्व समजावून सांगितल्याचे तसेच याहीपेक्षा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा केल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.