डोक्यात धगधगत असलेल्या त्या रागाचा 34 वर्षानंतर घेतला बदला ; 5 लोकांची केली हत्या

वाराणसी / नवप्रहार ब्युरो
एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेल असे हे प्रकरण आहे. आपल्या आई वडिल आणि आजोबांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याने चक्क 34 वर्ष वाट पाहिली. आयटी क्षेत्रात अभियंता असलेल्या या तरुणाने पाच लोकांची हत्या करून त्याच्या डोक्यात मागील 234 वर्षांपासून धगधगत असलेला राग शांत केला. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.
,वाराणसीमध्ये 5 नोव्हेंबर 2024 रोजी एका घरात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले, तर काही अंतरावर कुटुंबप्रमुख राजेंद्र गुप्ता याचा मृतदेह सापडला. या पाचही जणांच्या डोक्यात गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर समोर आलेली माहिती अधिक धक्कादायक ठरली. मृत राजेंद्र गुप्ताने 34 वर्षांपूर्वी आपल्या लहान भावाची, त्याच्या पत्नीची आणि स्वतःच्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर त्याने आपल्या भावाची तीन मुले-(दोन भाऊ आणि एक बहीण) स्वतःच्या घरी वाढवली. मात्र, त्यांचा कायम छळ करत राहिला.
या तिघांपैकी मोठा भाऊ विशाल गुप्ता, ज्याने आपल्या आई-वडिलांची हत्या स्वतःच्या डोळ्यांसमोर पाहिली होती, त्याने वर्षानुवर्षे मनात सूडाची भावना जपली. शिक्षण पूर्ण करून तो आयटी कंपनीत नोकरी करू लागला, पण मनातून त्या भयंकर रात्रीची आठवण काही केल्या पुसली जात नव्हती.
नोव्हेंबर 2024 मध्ये विशालने आपल्या काकाचा आणि त्याच्या कुटुंबाचा अंत करण्याचा निर्णय घेतला. आपल्या आई-वडिलांना जिथे ठार करण्यात आले होते, त्याच घरात त्याने काकाला, त्याच्या पत्नीला आणि तीन मुलांना गोळ्या घालून संपवले. त्यानंतर तो फरार झाला आणि तीन महिने विविध शहरांत लपून राहिला.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अखेर विशालला अटक केली. चौकशीत त्याने सर्व गुन्ह्याची कबुली दिली. आपल्या आई-वडिलांचे आणि आजोबांचे हत्यारे तसेच त्याचा आणि त्याच्या भावंडांचा छळ करणारा काका याचा शेवटी बदला घेतल्याचे सांगताना विशालच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता. उलट त्याच्या कृतीबद्दल तो शांत आणि समाधानी दिसत असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
या धक्कादायक प्रकरणाने वाराणसीत खळबळ उडवली असून, ३४ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रक्ताच्या खेळाचा शेवट अखेर एका सूडाने झाला आहे.