तो चार सशस्त्र दरोडेखोरांशी एकटाच भिडला न राव !
प्रतिनिधी अहिल्यानगर
.दुपारची वेळ ! माळवे सराफा दुकानात तशी गर्दी बऱ्यापैकी होती. सराफा दुकानातील कर्मचारी आलेल्या ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे दागिने दाखविण्यात गुंग असताना दुकानात अचानक चार दरोडेखोरांनी रिव्हॉल्वर, कोयते आणि तलवारी घेऊन प्रवेश केला. त्यांनी कर्मचाऱ्यांना धमकावून सोन्या- चांदीचे दागिने पिशवीत भरायला लावले. आणि ते त्या पिशव्या घेऊन दुकानाबाहेर पडणार इतक्यात त्या ठिकाणी आपल्या पत्नी आणि बाळासह बाळाचे कान टोचायला आलेल्या तरुणाचे लक्ष त्या तरुणांच्या हालचाली कडे गेले. त्यामुळे त्याने दरोडेखोरांच्या दिशेने धाव घेतली. त्याला दरोडेखोरांचा पाठलाग करताना पाहून इतर ग्राहक आणि दुकानातील कर्मचारी सुद्धा त्या दिशेने धावले . आणी त्यांनी दरोडेखोरांना पकडले. त्या बहादूर तरुणाचे नाव आहे रवी चिने. ते पोलीस कॉन्स्टेबल आहेत. त्याच्या ग धाडसाचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.
ही घटना कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील माळवे सराफ यांच्या दुकानात घडली आहे. चार दरोडेखोरांनी बंदूक आणि तलवारीचा धाक दाखवून सराफास लुटण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी सराफ दुकानात बाळाचे कान टोचण्यासाठी आलेल्या पोलीसाने दाखवलेल्या धाडसामुळे दरोडेखोरांचा प्लॅन फसला आहे.
रवी चिने असं संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. घटनेच्या दिवशी मंगळवारी ते आपल्या बाळाला घेऊन कान टोचण्यासाठी माळवे सराफ दुकानात आले होते. यावेळी भर दुपारी चार दरोडेखोर हातात बंदूक आणि तलवारी घेऊन दुकानात घुसले. त्यांनी दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांना धमकावत दुकानातील जवळपास तीन किलो सोने आणि तीन किलो चांदी घेऊन दुकानातून बाहेर पडायला सुरुवात केली. यावेळी रवी चिने यांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी देखील रवी यांची मदत केली. त्यांनी हातात तलवार फिरवणाऱ्या दरोडेखोरांना घेरून जाग्यावर पकडलं. यानंतर दरोडेखोरांना चोप देत तिघांना पोलिसांच्या स्वाधीन केले. रवी चिने हे सिन्नर पोलीस ठाण्यात कार्यरत असून ते पोहेगाव जवळील पाथरे येथील रहिवासी आहेत. त्यांच्या धाडसाचे आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे.