झोमॅटो बॉय म्हणून यायचे आणि रेकी करून जायचे
चोरांकडून 86 तोळे सोने ,150 हिरे आणि 3.5 किलो चांदी व रोकड जप्त
पोलिसांनी तपासले 3000 वसीसीटीव्ही कॅमेरे
पुणे / विशेष प्रतिनिधी
पुणे पोलिसांनी वर्षाच्या सुरवातीलाच मोठी कारवाई करत चोरांकडून चोरांकडून 86 तोळे सोने ,150 हिरे आणि 3.5 किलो चांदी व नगदी जप्त केली आहे. यासाठी पोलिसांनी 3 हजार सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत.
गणेश काठेवाडे, सुरेश पवार आणि अजय राजपूत असे तीन अटक केलेल्यांची नावे असून स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. .
3000 सीसीटीव्हींचा तपास
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुणे शहरातील विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना आम्हाला माहिती मिळाली होती की, काठेवाडे हा यातील मास्टरमाईंड आहे. त्या अनुषंगाने तपास करत असताना तब्बल 3000 सीसीटीव्हीचे फुटेज तपासून आम्ही त्याला अटक केली. काठेवाडे याच्याकडे सखोल तपास करता त्याने झोमॅटो डिलीव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जावून रेकी करुन विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण 14 घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. स्वतःची ओळख लपविण्यासाठी काठेवाडे हा उच्चभ्रू सोसायटीमध्ये रहात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.”
सोने विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला अटक
पुण्यातील या घरफोडी प्रकरणात काठेवाडे याचा साथीदार सुरेश पवार याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. या दोघांची ओळख कारागृहात झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर पुण्यातील विविध ठिकाणी घरफोडी करण्याचे दोघांनी ठरवले होते. याच प्रकरणात सोने विक्री करणारा व्यवसायिक अजय राजपूत याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणी सखोल चौकशी स्वारगेट पोलिसांकडून सुरू आहे.
झोमॅटो डिलीव्हरी बॉय
गणेश काठेवाडे हा मोक्का गुन्ह्यामधून जामिनावर सुटलेला असून त्याच्यावर पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण हद्दीमध्ये ५५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. या संपूर्ण गुन्ह्यातील मुख्य आरोपी गणेश काठेवाडे घरफोडी करण्यापुर्वी झोमॅटो डिलीव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जावून रेकी करुन घरफोडी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
चोरीचा मास्टरप्लॅन
घरफोडी करण्याच्या ठिकाणी येताना सुमारे ४० ते ५० कि.मी. चा प्रवास करुन घरफोडी करुन जाताना पुन्हा ४० ते ५० कि.मी. चा प्रवास छोट्या-छोट्या गल्ल्यांमधून करुन जात असे. तसेच घरफोडी करुन जाताना व घरफोडी करण्यासाठी येताना स्वतःची ओळख लपविण्यासाठी विविध जॅकेट, केसांचा विग, टोपी परिधान करुन वेशभूषा बदलत असे, अशी माहिती देखील समोर आली आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक
दरम्यान, चोरीचे दागिने यातून आलेले पैसे त्याने गोवा व इतर ठिकाणी मौजमजेसाठी उडवून काही पैसे शेअर मार्केटमध्ये (इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये) गुंतविल्याचे निष्पन्न झालं आहे.