आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके यांच्याहस्ते बाल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
![](https://navprahar.in/wp-content/uploads/2025/01/IMG-20250106-WA0010-780x470.jpg)
बाल खेळाडूंनी स्पर्धेत खेळाचे उत्तम प्रदर्शन करावे*
– प्रा.डॉ.अशोक उईके
यवतमाळ, : राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वनोजा येथे आयोजित तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते झाले. बाल खेळाडूंनी स्पर्धेत खेळाचे उत्तम प्रदर्शन करावे, असे ते यावेळी म्हणाले.
तालुकास्तरीय खेळ व क्रीडा संवर्धन मंडळ, पंचायत समिती शिक्षण विभागाद्वारा या शालेय बाल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. वनोजा शाळेच्या प्रांगणात सकाळी उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाला राळेगावचे तहसीलदार अमित भोईटे, गटविकास अधिकारी केशव पवार, गटशिक्षणाधिकारी राजू काकडे व तालुकास्तरीय सर्व अधिकारी उपस्थित होते.
खेळ स्पर्धा मुलांच्या सुप्त गुणांना व्यक्त करण्यासाठी संधी देते. त्यामुळे मुलांनी पुर्ण मन लावून आपला खेळ दाखवला पाहिजे. कोणतीही स्पर्धा कमी नाही. अशाच स्पर्धेतून भविष्यात मोठे खेळाडू घडत असतात, असे यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रा.डॉ.उईके बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीस प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलित करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, वनोजा ग्रामपंचायतचे सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच बाल खेळाडू, विद्यार्थी, शिक्षक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.