फेक प्रोफाइल तयार करून 700 मुलींना ओढले जाळ्यात ; उकळली रक्कम
मुलीने भेटायला बोलावल्यावर फुटले बिंग
नवी दिल्ली / नवप्रहार ब्युरो
फेक प्रोफाइल तयार करून एका २३ वर्षीय तरूणानं मुली आणि महिलांना ब्लॅकमेल करत पैसे उकळले आहेत. आरोपीनं आतापर्यंत १-२ नाहीतर, तर तब्बल ७०० मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. या सायबर क्रिमीनलला दिल्ली पोलिसांनी एका पीडित मुलीच्या तक्रारीवरून बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सायबर क्रिमीनलचे लक्ष्य १८ ते ३० वयोगटातील तरूण मुली आणि महिला होत्या. मुली आणि महिलांना आकर्षित करण्यासाठी आरोपीनं ब्राझिलियन मॉडेलचा फोटो आपल्या प्रोफाइलवर ठेवला होता. प्रोजेक्टसाठी भारतात येत असल्याचं सांगत तो मुलींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा.
यानंतर मुली आणि महिलांसोबत मैत्री करायचा आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. मैत्री अधिक घट्ट झाल्यानंतर तो मुलींकडे खाजगी फोटोंची मागणी करायचा. तरूण मुलगी किंवा महिला त्याच्या संवादाला आणि फेक प्रोफाइलला भाळून फोटो त्याच्यासोबत शेअर करायचे. काही दिवसानंतर आरोपी फोटो शेअर करण्याची धमकी द्यायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा.
या धक्कादायक प्रकरणाची माहिती १३ डिसेंबर २०२४ रोजी एका पीडित मुलीनं सायबर पोलीस ठाण्यात दिली. तक्रार दाखल करणारी मुलगी दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थीनी होती. तिने तक्रारीत म्हटलं की, ‘ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीला भेटली. त्या व्यक्तीनं स्वता:ची ओळख यूएस बेस्ड फ्रिलान्स मॉडेल म्हणून केली. एका प्रोजेक्टसाठी भारतात आलो असल्याचं त्यानं सांगितलं.
हळूहळू मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आरोपीनं नंतर खाजगी फोटोची मागणी केली. थोडाही संशय न घेत, मी त्याला माझे खाजगी फोटोही पाठवले.’ पीडित मुलीने आरोपीला भेटण्यास सांगितले. मात्र त्यानं थेट नकार दिला. यानंतर पीडिताच्या मोबाइलवर तिच्या खाजगी फोटोंचा व्हिडिओ पाठवला. एकतर पैसे दे,अन्यथा हा व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी आरोपीनं पीडित मुलीला दिली.
पीडित मुलीनं पैसे दिले. त्यानंतर त्यानं आणखीन पैशांची मागणी केली. याच त्रासाला कंटाळून मुलीनं घडलेली संपूर्ण घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली. यानंतर कुटुंबियांनी पोलीस गाठत या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केलं आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.
आरोपीचं नाव तुषार बिष्ट असून, तो दिल्लीच्या स्कूल ब्लॉकमध्ये राहत होता. त्याच्यासोबत आई-वडील आणि बहीण देखील राहत असे. तो याआधी नोएडा येथील एका कंपनीत कामाला होता. गेल्या दोन वर्षांपासून इंटरनॅशनल मोबाईल नंबर वापरायचा. याच नंबरच्या आधारावर त्यानं विविध सोशल प्लॅटफॉर्मवर बनावट प्रोफाइल तयार केले. याच बनावट प्रोफाइलद्वारे तो मुली आणि महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती आहे.
आरोपीनं आतापर्यंत बंबलवर ५००, स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअॅपवर २०० हून अधिक महिलांना फसवलं. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केलं असून, त्याचा मोबाईल, इतर बनावट आयडी, विविध बँकांची क्रेडिट कार्ड पोलिसांनी जप्त केल्या आहेत.