निवडणुकी पूर्वीच मनसे ला धक्का
निवडणुकी पूर्वीच मनसे ला धक्का
नांदगाव / विशेष प्रतिनिधी
निवडणुकीला फक्त काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. सर्विकडे प्रचाराचा धुरळा उडत आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. इतकेच नाही तर मनसे सत्तेत येण्याचा दावा सुद्धा करत आहेत. दरम्यान राज ठाकरे यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या उमेदवाराने केवळ निवडणुकीतून माघारच घेतली नाही तर चक्क उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना रंगणार असला तरी, मनसेनेही आपले शेकडो शिलेदार रिंगणात उतरवले आहेत.राज्यात सत्तेत येणार असल्याचा दावा नेत्यांपासून कार्यकर्ते करत आहेत. पण दुसरीकडे याच मनसेला नांदगावमध्ये मोठा धक्का बसला आहे. येथील मनसेचा शिलेदार म्हणजेच उमेदवारानंच ऐन राजकीय धुमाळीत निवडणुकीतून माघार घेतली आहे. या उमेदवारानं थेट ठाकरे गटातच प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Election) रण प्रचंड तापलं आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप, टीकेच्या तोफा डागल्या जात आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पहिल्यांदाच यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट होणार आहे. त्यात राज ठाकरेंची मनसेही तितक्याच ताकदीने उतरली असल्यानं रंगत आणखी वाढली आहे. मनसेने शंभराहून अधिक उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असताना काही ठिकाणी, विशेषतः मुंबईत मनसे विरुद्ध ठाकरे गटात सामना होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी टीकेच्या तोफा धडाडत आहेत. त्याचवेळी नांदगावमध्ये मनसेला ठाकरे गटानेच मोठा धक्का दिला आहे. नांदगावचे मनसेचे उमेदवार अकबर सोनावला यांनीच निवडणुकीत माघार घेतली आहे. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करत, उमेदवार गणेश धात्रक यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
नांदगावच्या आखाड्यात ट्विस्ट
नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला. मनसेचे उमेदवार अकबर सोनावला यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत थेट ठाकरे गटात प्रवेश केला. हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.
अकबर सोनावला यांच्या पत्नी सबिया या मनसेच्या नगरसेविका होत्या. या मतदारसंघात मनसेची मोठी ताकद नसली तरी, बऱ्यापैकी समर्थक आहेत. पण सोनावला यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळं ठाकरे गटाला नांदगावमध्ये फायदा होऊ शकतो, असे बोलले जात आहे.