मी ते दुःख विसरलो नाही – अमित ठाकरे
मुंबई / विशेष प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे माहीम मतदार संघातून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांचा मुकाबला शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्याशी आहे. अमित ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भाष्य केले आहे.
अमित ठाकरे यांनी पक्षात काम केल्यानंतर आता ते विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अमित ठाकरे यांनी एका वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. या मुलाखतीत अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना दिलेल्या त्रासाबाबत भाष्य केले. अमित ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटले की, ” 2017 साली मी आजारी होतो. त्यावेळी आमचे सहा नगरसेवक चोरले. हे आता खोके…खोके म्हणतायत तेव्हा किती खोके दिले होते हे मला माहित आहे. आमच्यासोबत राहिलेले सातवे नगरसेवक ह्यांनाही ऑफर होती, त्यांना किती खोके देणार होते, हे मला माहित असल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले.
अमित ठाकरे यांनी पुढे म्हटले की, उद्धव म्हणतात की मी आजारी असताना आमदार फोडले. पण मी आजारी असताना आमचा पक्ष फोडला त्यावेळी माझे वडील राज ठाकरे यांना किती त्रास झाला असेल. ते मी विसरलो नाही. तेव्हा जे मनात बसलंय ना, तेव्हापासून मी जरा लांबच आहे, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
नेमकं काय झालं होतं तेव्हा?
2017 मधील मुंबई महापालिकेच्या निवडणुका या शिवसेना आणि भाजपने स्वबळावर लढवल्या. त्यावेळी शिवसेना-भाजप सत्तेत होते. मुंबई महापालिकेत शिवसेना हा मोठा पक्ष होता. तर, भाजपने महापालिकेच्या सत्तेत सहभागी होणार नसल्याचे म्हटले होते. या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक निवडून आले होते. मनसेचे 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अपक्षांसह शिवसेनेचे संख्याबळ 100 हून अधिक झाले.
या घडामोडीच्या दरम्यान आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात अमित ठाकरे हे गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी पूर्णपणे निवडणुकीत झोकून दिले नव्हते. मनसेचे इतर नेते सक्रिय झाले होते.