हरियाणाचे निकाल येताच काँग्रेस ला दोन हादरे
नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो असे म्हटल्या जाते. अनेक वेळा ते पाहायला देखील मिळते. हरियाणाच्या निकाला यानंतर काँग्रेस ला दोन मोठे हादरे बसले आहेत. एक दिल्लीतून तर दुसरा उत्तरप्रदेश मधुन आहे.
हरियाणातील सत्ताधारी भाजपला शेतकऱ्यांनी घेरलेले असताना, कुस्तीगिरांचा राग असताना आणि अग्निवीरमुळे युवा वर्गाचा रोष असतानाही काँग्रेसला याचा फायदा उठवता आला नाही. १० वर्षांनंतर काँग्रेस पुनरागमन करेल, अशी शक्यता असताना भाजपने सूक्ष्म नियोजन करून निवडणूक कशी जिंकायची असते, हे दाखवून दिले.
सत्ता आलीच आहे, आता मुख्यमंत्री ठरवायला हरकत नाही, अशा आर्विभावात काँग्रेस होती. सातव्या आस्मानावर असलेल्या काँग्रेसला निवडणूक निकालानंतर एकाच दिवशी जबर दोन धक्के बसले आहेत.
हरियाणा निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीतील मित्रपक्ष स्वत:ला मोठा भाऊ समजणाऱ्या काँग्रेसला खिंडीत गाठण्यासाठी सरसावले आहेत. जसेही हरियाणाचे निकाल समोर येऊ लागले तसे आघाडीतील मित्रपक्षांनी काँग्रेसला टोमणे मारायला सुरूवात केली. पक्षांतर्गत लाथाळ्यामुळे हातातोंडाशी आलेला काँग्रेसच्या विजयाचा घास भाजपने हिरावून नेल्याचे अनेक मित्रपक्षांनी सांगितले. निकालाला २४ तास उलटत नाही तोच काँग्रेसला ४४० व्होल्टचे जबर धक्के बसले आहेत.
कुणाशीही युती न करता दिल्ली स्वबळावर लढणार
काँग्रेसला पहिला झटका बसला आहे दिल्लीत… हरियाणात काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर आम आदमी पक्षाने मोठी घोषणा केली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्ही कुणाशीही युती न करता एकटे लढू, अशी घोषणा आपच्या प्रवक्त्या प्रियंका कक्कड यांनी केली. “एका बाजूला अति आत्मविश्वास असलेली काँग्रेस पार्टी आहे तर दुसऱ्या बाजूला अहंकारी भारतीय जनता पार्टी आहे. मागील १० वर्षात आम्ही दिल्लीकरांसाठी जी कामे केली, त्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जावू”, असे प्रियंका कक्कड म्हणाल्या.
हरियाणाच्या निकालाआधी काँग्रेस आणि आप दिल्ली विधानसभा निवडणूक एकत्रित लढतील, अशी शक्यता होती, परंतु विधानसभेला निकाल लागताच आपने काँग्रेसला लगोलग अंतर दिले आहे.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने काँग्रेसला न विचारताच ६ उमेदवार जाहीर केले
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या हातात हात घालून जनतेसमोर गेलेल्या अखिलेश यादव यांनी हरियाणाचा निकाल लागताच ‘एकला चलो’चा पवित्रा घेतला. मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला न विचारताच समाजवादी पक्षाने पोटनिवडणुकीसाठी ६ उमेदवारांची घोषणा केली आहे.
अखिलेश यादव यांच्या करहल विधानसभेसाठी तेजप्रताप यादव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तेजप्रताप हे अखिलेश यादव यांचे चुलत बंधू आहेत. अयोध्येच्या मिल्किपूर विधानसभेसाठी अजित प्रसाद यांना उमेदवारी दिली गेली आहे. अजित हे खासदार अवधेश प्रसाद यांचे चिरंजीव आहेत. मिर्जापूरच्या मझंवामधून डॉ. ज्योती बिंद तर आंबेडकर नगरच्या कटेहरीमधून शोभावती वर्मा यांना उमेदवारी दिली गेली आहे.