शेती विषयक
आधुनिक युगात शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करावा – खासदार बळवंत वानखडे
कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर तर्फे कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह व विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
अमरावती दि. (प्रतिनिधी) : भारत हा कृषिप्रधान देश असून आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कृषी अर्थव्यवस्था आहे. जगात आपल्या देशाचे नाव आपल्या शेतीमुळेच लौकिकास पोहोचले आहे. परंपरांनी आपल्या देशातील शेतकरी हे शेती करत आले आहेत. वडिलोपार्जित शेती व्यवस्थापन नव्या पिढीने आता स्वीकारला आहे मात्र परंपरेने आलेली शेती पारंपरिक पद्धतीने करणे कुठेतरी थांबले पाहिजे. शेतीमध्ये आज घडीला नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे हे तंत्रज्ञान नव्या युगाची नांदी असून वर्तमान आधुनिक युगात युवकांनी तंत्रज्ञानावर आधारित शेती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अमरावती लोकसभा मतदार संघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी केले ते कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर तर्फे आयोजित कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह व विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. के. पी. सिंह, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूरचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. सुनील महाजन, अचलपुरचे उपविभागीय कृषि अधिकारी रविंद्र वाघ, उमरी इतबारपुरचे सरपंच अब्दुल सिद्दिक अब्दुल शब्बीर, उमरी बाजारचे सरपंच जयेश नागदिवे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र वडाळ, उमरी इतबारपुरचे प्रगतिशील शेतकरी गजानन कोळमकर, उमरी इतबारपुरचे प्रगतिशील शेतकरी गणेशराव दिगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार वानखडे म्हणाले की, कापूस हे आपल्या परिसरातील महत्त्वाचे पीक आहे. मात्र हे पीक घेत असताना शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वारंवार एकाच जातीच्या कपाशीची लागवड करू नये तर वाण फेरपालट करून आधुनिक वाणाचा संशोधनातून विकसित झालेले वाण शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे. कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर हे शेतकऱ्यांसाठी अहोरात्र कार्य करीत आहे. शेतकऱ्यापर्यंत शेती तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी ते सातत्याने शेतकरी प्रशिक्षणे, मेळावे, कार्यशाळेचे आयोजन करीत आहेतच. शेतकऱ्यांनीही कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याच्याकडून शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर हे समाज माध्यमाच्या वापरातूनही शेतकऱ्यांशी संपर्क साधून असतातच पण शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन तेथील संपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेती करावी असेही ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. के. पी. सिंह यांनी कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर येथे शेतकऱ्यांसाठी असलेल्या माती – पाणी परीक्षण, बियाणे उगवण क्षमता चाचणी, जैविक कीडनाशके व जैविकखते उत्पादन, फळे व भाजीपाला प्रक्रिया अन्नपरीक्षण प्रयोगशाळा, नर्सरी, मशरूम उत्पादन तंत्रज्ञान, गांडूळखत उत्पादन तंत्रज्ञान, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन व प्रमाणित जातीचे सोयाबीन, तूर, मूग व हरभरा या पिकाचे बियाणे तसेच शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या कापूस विशेष प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली.
आपल्या तांत्रिक मार्गदर्शनात डॉ. सुनील महाजन यांनी कापूस अति सघन लागवड तंत्रज्ञानातील, कॅनोपी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, कीड व्यवस्थापनाबाबत विस्तृत माहिती दिली, तर राजेंद्र वाघ यांनी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
कार्यक्रमात योगेश पोटे या युवा शेतकर्याभने कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुरने त्यांच्या गावात राबविलेल्या अनेक उपक्रमामुळे शेतकऱ्याचा आणि शेतीचा विकास कसा झाला याचे विवेचन आपल्या मनोगतातून केले.
कार्यक्रमानंतर विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या उमरी इतबारपूर येथील मुकुंद कोळमकर यांच्या शेतातील राशी सीड्स, सागर बुधलकर यांच्या प्रवर्धन सीड्स तर उमाकांत कडू यांच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्राला भेट खासदार बळवंत वानखडे, डॉ. के. पी. सिंह, डॉ. सुनील महाजन, डॉ. हर्षद ठाकूर यांचे सह बियाणी कंपनीचे प्रतिनिधी समीर चावरे, सुधाकर जायले, नटराज राठोड, आशुतोष शिंदे, जितेंद्र मापारी, गणेश कासोलकर, दीपक टाले, प्रवीण ठाकरे, इत्यादींनी भेटी दिल्यात. यावेळी डॉ. हर्षद ठाकूर यांनी विशेष कापूस प्रकल्पा अंतर्गत असणार्या, प्रात्यक्षिकाबाबतबाबत उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. प्रतापराव जायले यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष देशमुख यांनी केले तर अक्षय गणेशपुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाला उमरी इतबारपुर, उमरी बाजार, वडाळ गव्हाण, कुमारगाव, अंतरगाव, खुर्माबाद इत्यदि गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता डॉ. विशाखा पोहरे, डॉ. आनंद वरघट, अश्विनी रंगे, ऋषिकेश शिंदे, महेंद्र सेंगर, राहुल जगताप, उमेश तायडे, विशाखा राणोटकर, निशा राठोड, शुभम नळकांडे, योगेश कडू, रविंद्र गाडगे, गौरव उखळकर, आकाश सदार, प्रज्वल शेळके, ऋषिकेश काळे, वैशेष पळसापुरे यांनी विशेष प्रयत्न केले.