काँग्रेस कडून उबाठा गटाला तारीख पे तारीख : काँग्रेस उबाठा गटाला डावलत असल्याची चर्चा

१६ ऑगस्टला मुंबईत महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी २०१९ चा भाजपासोबतच्या युतीचा संदर्भ दिला. त्यात ठाकरे म्हणतात, २०१९ ला भाजपानेदेखील ‘ज्या पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल’ असे जाहीर केले आणि दोघांमध्ये एकमेकांचे उमेदवार पाडण्याची स्पर्धा लागली. २०१९ ची विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपा युती म्हणून लढले. निवडणूक झाल्यानंतर भाजपाने मुख्यमंत्री पदाचे दिलेले आश्वासन पाळले नाही, असा खोटा प्रचार उद्धव ठाकरे यांनी करायला सुरुवात केली तसेच ‘भाजपाने आश्वासन पाळलं नाही म्हणून भाजपाशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले’, असे ठाकरे यांनी सांगितले.
दुसरीकडे, ‘ज्यांच्या जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री’, असे निवडणुकीआधी ठरल्याचा दावा भाजपाने केला आहे, तर ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते, असेही भाजपाने स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबतच्या युतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जी खेळी केली, तीच आता महाविकास आघाडीसोबत करण्याचे प्रयत्न सुरू केल्याची भावना काँग्रेसच्या नेत्यांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून (Congress) आता सावध पवित्रा घेतला जात आहे.
दरम्यान, मुंबईतील ३६ पैकी २२ जागांवर उबाठाने दावा केला आहे. तर काँग्रेसला १८ जागांची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीतही उबाठाने दादागिरी करत अधिक जागांवर दावा करत २१ उमेदवार उभे केले मात्र त्यातील केवळ ९ निवडून आणू शकले. याउलट काँग्रेसने (Congress) १७ जागा लढवल्या आणि १३ निवडून आणल्या. यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीत मोठा भाऊ झाल्यानंतरही उबाठाची दादागिरी सुरूच असल्याने काँग्रेस उबाठापासून अंतर राखू लागली आहे.
उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी बुधवारी, १८ सप्टेंबरला पत्रकारांशी बोलताना काँग्रेसला चांगलेच टोले हाणले. महाविकास आघाडीच्या बैठकीला कोणकोण असणार आहेत? असे विचारले असता राऊत म्हणाले, “सगळेच असतील बैठकीला. नावे घेण्याची गरज नाही. काँग्रेस (Congress) पार्टी आजकल खूप व्यस्त आहे, तरी त्यांना जागावाटपाच्या चर्चेला आम्ही बोलावले आहे. काँग्रेस पार्टीचे नेते इतके व्यस्त आहेत की दरवेळी ‘तारीख पे तारीख’ देत आहेत. म्हणून आम्हीच ठरवले की काहीही झाले तरी आजपासून तीन दिवस बैठका करू आणि विषय मिटवू,” असे राऊत म्हणाले.