नदीच्या निळ्या पुररेषेत भराव टाकून पाच एकर जागा बळकावण्याचा प्रयत्न करणारा कोण ?
यामागे रॅकेट असण्याची शक्यता
पुणे, {नवप्रहार वृत्तसेवा}
राजाराम पूल ते शिवणेपर्यंत मुठा नदीच्या निळ्या पूररेषेत येत असलेल्या पाच एकर जागेत रोडा व इतर मटेरियल टाकून जागा तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या जागेची किंमत कोटीत असल्याने हा सगळा प्रकार आर्थिक हेतुतून करण्यात तर आला नाही ना ? आणि असे होत असताना प्रशासन झोपा काढत होते काय असे नानाविध प्रश्न उपस्थित होत आहेत. यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नदीत भराव टाकून जागा तयार करणाऱ्यांनी याच परिसरात आपल्या जागा रस्त्यासाठी देण्यास नकार दिल्याचेही समोर आले आहे. सिंहगड रस्त्यावर एकतानगरी, निंबजनगर आणि विठ्ठलवाडीतल पूरस्थितीला हाच राडारोड्याचा भराव जबाबदार असल्याचे समजल्यानंतर महापालिकेने जलसंपदा विभागासोबत संयुक्त कारवाई सुरू करून राडारोडा उचलण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले, उपायुक्त माधव जगताप यांनी ही माहिती दिली.
मनपा बांधकाम विभागाने कर्वेनगर बाजूच्या नदीपात्रात कारवाई केली. यामध्ये १२ जेसीबी, तसेच २५ डंपरने तब्बल ६०० टन राडारोडा काढण्यात आला. येथे बांधकामे करण्याची तयारी सुरू असल्याचे समोर आल्याने तेथील इतर साहित्यांवरही पालिकेने कारवाई केली. या कामाचा खर्च संबंधित जागामालकांकडून वसूल केला जाणार आहे.
नदीपात्रात भराव टाकून भूखंड निर्माण केल्याचे समोर आले आहे. हा राडारोडा काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही जबाबदारी जलंसपदा विभागाची आहे. त्यामुळे त्यांनाही सूचना केल्या आहेत. ज्यांनी राडारोडा टाकला, त्यांना नोटीस दिल्या आहेत. – डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका.
ग्रीन झोनमध्ये बांधकामे
मुठा नदीपात्रात सनसिटी रस्त्याच्या बाजूला ग्रीन बेल्टमध्ये, तसेच निळ्या पूररेषेत अनधिकृत बांधकामे अथवा राडारोडा टाकल्यास तत्काळ कारवाई केली जाते. मात्र, कर्वे रस्त्याच्या बाजूला हे प्रकार सर्रास असताना महापालिका त्याकडे लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे.
यातील बघुतांश जागा जलसंपदा विभागाची असताना तेथे लगतचे जागामालक बांधकाम व्यावसायिकांना राडारोडा टाकण्यास परवानगी देऊन पैसे घेतात. याच जागा सपाट करून त्याचा व्यावसायिक वापर करतात आणि लाखो रुपये भाडे वसूल करतात. मात्र, महापालिकेस त्याची कल्पना कशी नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे