टाळ मृदंगाच्या गजरात संत नगरीमध्ये श्रींचा आगमन सोहळा संपन्न
भर पावसात असंख्य वारकऱ्यांची उपस्थिती*
बाल वैष्णवांनी साकारल्या संतांच्या वेशभूषा*
अकोला : पंढरीची वारी आहे माझे घरी | आणिक न करी तीर्थव्रत || या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंगानुसार संपूर्ण जगातून संत-महात्म्यांचे पालखी सोहळे श्री क्षेत्र पंढरपूर वारीकरिता दाखल झाले होते. आषाढी वारी पूर्ण होऊन सर्व संत माघारी परतले आहेत. वारकरी संतांच्या परंपरेतील महावैष्णव श्री संत वासुदेव महाराज यांचासुद्धा पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर वारी पूर्ण करून संत नगरी आकोटमध्ये माघारी परतला आहे. श्रींच्या या पालखी सोहळ्याचे टाळ-मृदंगाच्या गजरात आकोटवासियांनी जल्लोषात स्वागत करुन आगमन सोहळा साजरा केला.
सर्वप्रथम श्री संत वासुदेव महाराज निवासस्थान येथे श्रींचा अभिषेक व आरती होऊन दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला. शहराच्या मुख्य मार्गाने पालखी सोहळा नंदीपेठ येथे पोहोचल्यावर अनंत गणगणे यांनी पालखी सोहळ्याचे पूजन करुन स्वागत केले. पालखी मार्गाने देवांश सचिन पांडे, प्रणील सचिन पांडे, यश रेळे, प्रतीक्षा रेळे, नंदिनी पालखडे या बालवैष्णवांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री महाराज, श्री विठ्ठल, श्री रुक्मिणी, आदी वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे प्रवेशद्वारावर श्रींचा पालखी सोहळा आल्यावर श्री संस्थेतर्फे भावपूर्ण पूजन व स्वागत सोहळा पार पडला. ठिकठिकाणी पुष्प सजावट, रांगोळीची आरास यांनी वातावरण आल्हाददाई होते. या ठिकाणी वारकरी भाविकांनी फुगड्या, पावल्या खेळून जल्लोष साजरा केला. वारकरी भवन येथे श्रींची महाआरती संपन्न झाली. समारोपिय मनोगत व्यक्त करताना संस्थाध्यक्ष श्री ह भ प वासुदेवराव महाराज महल्ले म्हणाले की, सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांच्या कृपाशीर्वादाने यावर्षी हा पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. श्रींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्याकरता श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे पावसाने वारकऱ्यांचे केलेले स्वागत बघून, मंद मंद पडे पाऊस | व यज्ञात् भवती पर्जन्यो | या पदाची आठवण करून दिली. त्याचप्रमाणे संपूर्ण पालखी सोहळ्यातील आठवणींना उजाळा दिला. पालखी सोहळ्याच्या यशस्वीतेकरिता मिळत असलेल्या योगदानाबद्दल सेवाधारी, अन्नदाते, महाराज मंडळी यांचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले. प्रस्तुत कार्यक्रमाकरिता विश्वस्त मंडळाचे महादेवराव ठाकरे, पुरुषोत्तम लाजूरकर, रवींद्र वानखडे, अशोकराव पाचडे, अनिलभाऊ कोरपे, गजाननराव दुधाट, पुरुषोत्तम मोहोकार, व्यवस्थापक अमोल मानकर, दिलीप कुलट, महादेवराव बोरोकार, नंदकिशोर झामरे यांसह असंख्य भाविकांची उपस्थिती होती.
श्री क्षेत्र पंढरपूर धर्मशाळेकरिता लिफ्टची सुविधा अर्पण केल्याबद्दल सुरेंद्र चिकटे व सौ लताताई चिकटे या उभयतांचा संस्थेतर्फे भावपूर्ण सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे पालखी सोहळ्याची अत्यंत चोख व्यवस्था व शिस्तबद्ध नियोजन करणारे दिंडी व्यवस्थापक श्री ह भ प अंबादास महाराज मानकर यांना चिकटे परिवारातर्फे “चांदीची लेखणी” देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. विविधांगी सेवा दिल्याबद्दल तेजराव महाराज म्हसाये, मदन महाराज मोहोकार, शारंगधर गावंडे, प्रभाकर डोबाळे, प्रवीण मोहोकार, कृष्णा वाकोडे, समाजसेवक तथा पत्रकार गजानन हरणे, विठ्ठल मेंढे, ज्ञानेश्वर अरबट, गोपाल वानखडे, उमेश वनकर, श्रीराम कोरडे, बाळकृष्ण वाकोडे, मधुकर पुंडकर, नितीन हिंगणकर, चंद्रकांत कोल्हे, गणेश वालसिंगे, सुलभा रेळे, सुरक्षारक्षक आदींचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. श्रींच्या आगमन सोहळ्याकरिता घोडेगाव, वारुळा, पिंपरी जैनपूर, जळगाव नहाटे, गुरुमाऊली भजनी मंडळ आकोट, आदी गावांचे वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळांसह सर्व श्री ह भ प अंबादास महाराज मानकर, विष्णु महाराज गावंडे, सोपान महाराज काळुसे, आत्माराम महाराज वाकोडे, अमोल महाराज पांडे, पवन महाराज काळमेघ, उमेश महाराज मोहोकार, शिवा महाराज वाघ, ऋषी महाराज सोनोने, आदी महाराज मंडळींची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अशी माहिती वारीतील वारकरी समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे..