नदीच्या बदललेल्या प्रवाहाचा शेतकऱ्यांना बसतोय फटका
वाळू च्या अमाप उत्खननामुळे उद्भवली परिस्थिती
तुमसर / प्रतिनिधी
वाळू तस्कर आणि प्रशासनाच्या मिलिभगतीचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. नदीच्या पुरात शेतकऱ्यांची जमीन भुस्खलणामुळे नदी पात्रात समावत आहे. वाळूच्या अमाप उत्खाननामुळे हा प्रकार घडत असल्याचे भौगोलिक जाणकारांचे मत आहे. तालुक्याच्या उमरवाडा, बोरी व कोष्टी या परिसरातील लोकांना याचा फटका बसत आहे.
एकट्या बोरी येथे सुमारे ३०० एकर शेती नदीपात्रात समाविष्ट झाली आहे. दरवर्षी नदीकाठ भूस्खलन होत असून त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथे तात्काळ संरक्षण भिंतीचे बांधकाम न केल्यास येत्या काही वर्षात ही तीन गावे नदीपात्रात समाविष्ट होण्याच्या धोका आहे.
तालुका मुख्यालयापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरी उमरवाडा व कोष्टी या गावाच्या दिशेने झपाट्याने वैनगंगेचे नदीपात्र पुढे सरकत आहे. त्यामुळे या तिन्ही गावांना धोका निर्माण झाला आहे. मागील वीस वर्षापासून नदीचे पात्र गावाच्या दिशेने झपाट्याने पुढे सरकत आहे. परंतु प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. एकट्या बोरी येथे सुमारे ३०० एकर शेती मागील २० वर्षात वैनगंगा नदीने गिळंकृत केली आहे. विनोद साखरवाडे या शेतकऱ्याची तर बारा एकर शेती नदीपात्रात समाविष्ट झाली. रोशनलाल मेश्राम यांची दहा एकर शेती नदीपात्रात गेली, दोन एकर तसेच तीन एकर अशी शेतकऱ्यांची शेती येथे नदीपात्रात समाविष्ट झाली. शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत. दरवर्षी पुरात येथील शेतीमधील पीक नष्ट होत आहे. शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
नदीचा प्रवाह का वळला ?
तुमसर व तिरोडा हे दोन्ही तालुके या नदीपात्राच्या काठावर आहेत. तुमसर व तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूच्या उपसा दरवर्षी केला जातो. त्याच्या परिणाम असा झाला की तुमसर तालुक्याच्या दिशेने नदीचे पात्र है सखल झाले असून एक ते दीड किलोमीटरच्या मोठा खट्टा येथे पडला आहे. पावसाळ्यात नदीच्या प्रवाह त्या सखलभागातून तुमसर तालुक्यातील गावाकडे वळणे सुरू झाले.
अनिल बावनकर यांनी केले होते प्रयत्न
२०१० – ११ मध्ये आमदार अनिल बावनकर यांनी राज्याचे कृषिमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांना बोरी येथे वैनगंगेच्या नदी काठावर पाहणी करिता घेऊन आले होते. त्यांनी संरक्षण भिंत बांधण्याकरिता निधी देता येईल काय व एवढ्या विस्तीर्ण नदीला संरक्षण भिंत बांधण्यासंदर्भात सचिव स्तरावर चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यानंतर मात्र कोणतीही चर्चा झाली नाही.
नदीपात्र बदलण्याची गरज
उन्हाळ्यात या गाव परिसरातील नदीचे पात्र उपसा करून समतल करण्याची गरज आहे. त्यामुळे तुमचा तालुक्यातील गावाकडील सखल भाग हा समतोल होईल. तसेच या गावाच्या दिशेने सुमारे दीड तो दोन किलोमीटर संरक्षण भित बांधल्यास नदीकाठाचे भूस्खलन होणार नाही. त्या करीता सुमारे ३० ते ३५ कोटी निधीची गरज आहे. हा निधी खेचून कोण आणणार, असा प्रश्न आहे.