सैन्य दलातील पतीला साथीदाराच्या मदतीने पाजले विष
गडहिंग्लज / नवप्रहार डेस्क
कुटुंबियांच्या भेटीसाठी सुटीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाला पत्नी आणि तिच्या साथीदाराने विष पाजून मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार गडहिंग्लज येथे उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात पत्नीला अटकळ केली असून साथीदार फरार झाला आहे. तर जवान अमर भीमगोंडा देसाई याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे.
अमर हे जम्मू-काश्मीर येथे कार्यरत आहेत. 3 जुलैला ते सुट्टीवर आले आहेत. त्यांची सुट्टी 1 ऑगस्टपर्यंत असल्याने घरातील सर्व कामे ते करत होते. मूळगाव नूल असून, सध्या गडहिंग्लजमधील पाटणे सिमेंट पाईप कारखान्यानजीक ते स्वतःच्या बंगल्यात पत्नी तेजस्विनी, आठ वर्षांचा मुलगा व पाच वर्षांच्या मुलीसह राहतात.
विषारी द्रवपदार्थ पाजले
18 जुलै रोजी घरातील सर्व कामे आटोपून ते बेडवर झोपले असता रात्री 9.30 च्या सुमारास त्यांना आपल्या तोंडात कुणीतरी काही कोंबत आहे, असा भास झाला. डोळे उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून हात-पाय बांधल्याचे त्यांच्या लक्षात आले. पत्नी व तिच्यासोबत असलेला साथीदार तोंडात व नाकात कोणता तरी विषारी द्रवपदार्थ ओतत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. यावेळी शेजारी धावत आले. शेजार्यांनी कडी मोडून आत प्रवेश केला व अमर यांना रुग्णालयात दाखल केले. अमर यांनी घरात असतानाच आणखी एक व्यक्ती घरात असल्याचे सांगताच त्यांचे शेजारी खाडे हे पाहण्यास गेले असता अज्ञाताने खाडे यांच्या डोक्यात काही तरी मारून त्यांना जखमी करून पळ काढला. घटनास्थळावर अमर यांनी रक्ताची उलटी केल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे जाणवून आले. ग्रामोझोन हे अत्यंत कडक विषारी औषध असल्याने डॉक्टरांनी अमर यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निशानदार करीत आहेत.
फॉरेन्सिकचे पथकाने घेतले ठसे
पोलिस निरीक्षक सरगर यांनी कोल्हापूरच्या फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. पथकाने विविध वस्तूंवरील ठसे, कपडे घेतले असून, तपास सुरू केला आहे.