आपणालाही हिरव्यागार काकड्या पाहून त्या विकत घेण्याचा मोह आवरत नाही तर वेळीच व्हा सावध
नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क
मान्सूनच्या विलंबामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. जेवनात काकडी आणि गाजर खाण्याचे अनेक फायदे आहेत असे आहार तज्ञ सांगतात. तसेच उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने उष्माघाताच्या त्रासापासून वाचता येते असे म्हटल्या जात असल्याने या दिवसात लोकांचा काकडी खाण्यावर भर असतो. याच गोष्टीचा फायदा घेत मंडीतील व्यापारी लोकांच्या जीविताशी खेळत आहेत. काकडी ताजी दिसावी यासाठी ते त्याला रंग देत आहेत. आणि त्या ताज्या असल्याचे सांगत ग्राहकांकडून जास्त भाव देखील आकारत आहेत.
कडाक्याच्या उकाड्यामुळे भाज्यांचे भाव वाढल्याचं सांगितलं जात आहे. उकाड्यामुळे भाज्यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे. बाजारात भाज्यांची आवक कमी होताच त्यांच्या किमती अक्षरशः गगनाला भिडल्या. दरम्यान, सोशल मीडियावर पाटण्यातल्या भाजी मंडईतला एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे.
महागाई असतानासुद्धा लोक नाईलाजानं भाज्या खरेदी करत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात लोक हमखास काकडी खाण्याला प्राधान्य देतात. काकडी खाल्ल्यानं उष्माघाताचा त्रास टाळता येतो, तसंच पोटालाही आराम मिळतो. परंतु, पाटण्यातल्या एका भाजी मंडईमध्ये भाजी घेण्यासाठी आलेल्या एका इसमाने एक दृश्य पाहिलं आणि त्याचा व्हिडिओ केला. नंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. तिथे नेमकं काय झालं, हे तुम्हीही जाणून घ्या.
हिरव्या काकड्यांमागचं रहस्य
मंडईमध्ये एक दुकानदार काकड्या जास्त किमतीने विकत होता. किमती वाढल्या असतानाच या काकड्या हिरव्यागार आणि ताज्या असल्याचा दावा विक्रेत्यानं केला होता. म्हणूनच त्यांची किंमत जास्त असल्याचं त्याने सांगितलं. या मंडईमध्ये एका जागी अनेक महिला टबमध्ये पाणी घेऊन बसल्या होत्या. खरं तर तिथं काकड्यांना हिरवंगार करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्या महिला टबमध्ये हिरवा रंग मिसळून काकडीला रंग देत होत्या. त्यानंतर भाज्यांचा रंग हिरवा झाला. त्यानंतर त्या भाज्या ताज्या आणि हिरव्यागार असल्याचं सांगून चढ्या दरानं विकल्या जातात.
लोकांनी आवाज उठवला
मंडईमध्ये भाजी घेण्यासाठी आलेल्या एका इसमानं लोकांच्या जिवाशी होणारा हा खेळ पाहिला. खरं तर ज्या रसायनानं भाज्या रंगवून विकल्या जात होत्या, ती आरोग्यासाठी चांगली नसतात. अशी रसायनं पोटात गेल्यामुळे कॅन्सरसारखे घातक आजार होऊ शकतात. तरीही लोकांच्या जिवाशी खेळून आपल्या भाज्यांच्या किमती वाढवून लोक व्यवसाय करतात. एखाद्या रसायनमिश्रित पाण्यात मिसळून भाज्या रंगवल्या जातात आणि चढ्या दरानं विकतात. हा सगळा प्रकार व्हिडिओमध्ये पाहून लोक थक्क झाले. आता तर हद्द झाली, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. अशी कामं आता उघडपणे केली जात आहेत. खुलेआम विषात भाज्या बुडवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.