वर्धेचे भाजपा उमेदवार रामदास तडस यांचेवर सुन पूजाचे गंभीर आरोप
मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचविण्यासाठी माझ्या सोबत लग्न लावून देण्यात आले.
वर्धेत प्रचारासाठी येणाऱ्या मोदींकडे वेळ मागत न्यायाची केली मागणी
नागपूर / नवप्रहार डेस्क
लोकसभा निवणुकीच्या प्रचारात पाहिजे तशी रंगत आली नसली तरी उमेदवार प्रचाराला भिडले आहेत. राज्यात बारामती मतदार आपसातील लोक एकमेकांच्या विरुद्ध ठाकल्याचे दिसत आहे. अश्यातच वर्धा लोकसभा मतदार संघाचे भाजपा उमेदवार रामदास तडस यांच्या सुनेने आज नागपूर येथे पत्रकार परिषद घेत सासरे रामदास तडस यांचेवर गंभीर आरोप केले आहेत. पूजा तडस या वर्धा लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून उभ्या राहणार आहेत. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
पूजा तडस यांनी नागपुरातील प्रेस क्लबमध्ये एक पत्रकार परिषद घेत सर्वांत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मला वेगवेगळ्या फ्लॅटवर ठेवून उपभोगाची वस्तू समजली, असं म्हणत त्यांनी सासरे रामदास तडस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या.
“आपल्या मुलाला बलात्काराच्या आरोपापासून वाचवण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं गेलं. मला एका फ्लॅटवर नेऊन टाकण्यात आलं. त्याठिकाणी मला अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली. जिथे मी राहते तिथे फक्त मला उपभोगाची वस्तु समजण्यात आलं. त्यातून हे बाळ जन्माला आलं. माझ्या बाळाच्या जन्मानंतर हे बाळ कुणाचं?, या बाळाची डीएनए टेस्ट करा, असं सांगण्यात आलं. 17 महिन्यांचे माझं बाळ आहे, माझ्यावर प्रत्येकवेळी अत्यंत घाणेरडे आरोप करण्यात आले.”, असा खुलासा पूजा तडस (Pooja Tadas) यांनी केला आहे.
मला लोखंडी रॉडने मारण्यात आलं. मी याचे पुरावेदेखील सर्वांना देणार आहे. एका स्त्रीवर इतके अत्याचार?, मला बेघर करण्यात आलं. महिलांना आरक्षण द्या, असं तडस म्हणतात. मग, माझ्यासोबत हा अन्याय का?, मला दोन वेळचं अन्नही मिळत नव्हतं, माझ्यावर खूप अत्याचार करण्यात आले, असा गंभीर आरोप पूजा तडस यांनी केला आहे.
“मोदींनी मला न्याय द्यावा”
यावेळी पूजा तडस यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. “ज्या लोकप्रतिनिधीची सभा घेण्यासाठी मोदी 20 तारखेला वर्ध्यात येत आहेत. त्यांना माझी विनंती आहे. मोदींनी माझ्या मुलाला न्याय द्यावा. मोदींनी सभेसाठी आल्यानंतर मला थोडा वेळ द्यावा आणि त्यांनी मला न्याय द्यावा.’, अशी मागणी पूजा तडस यांनी केली आहे. त्यांच्या या आरोपांची आता राज्यभर चर्चा रंगली आहे.