राधिकाची मॅजिकल कार कॅप ठरणार वाहन चालकांना वरदान…
राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
कारंजा प्रतिनिधी डॉ. गुणवंत राठोड
कामरगाव:-प्रभात किड्स अकोला येथे आयोजित इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात जि.प.विद्यालय कामरगावच्या राधिका विकास देशमुख या विद्यार्थिनीने तयार केलेल्या मॅजिकल कार कॅपमुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत.तिच्या या अभिनव अशा प्रतिकृतीची निवड राज्यस्तरावर होणाऱ्या इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनीकरीता झाली आहे.वेगवेगळ्या कारणांमुळे वाहनांचे अपघात नेहमीच होत असतात.अपघातां मध्ये प्राणहानी आणि वित्तहानीही होत असतात.वाहन अपघातामध्ये डुलकी लागल्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण काही कमी नाही.अशीच डूलकी लागल्यामुळे झालेल्या अपघातात तीन ठार ही बातमी पाहून व्यथीत झालेल्या राधिकांने आपल्या शिक्षिका निता तोडकर व शिक्षक गोपाल खाडे यांच्याशी चर्चा करून डूलकी लागताचं गाडीत सजग करणारी यंत्रणा अगदी स्वस्त दरात तयार केली आहे.शाळेचे मुख्याध्यापक प्रा.सुरेश राठोड व इन्स्पायर वाशिम जिल्हा समन्वय विजय भड यांनी राधिकाचे विशेष कौतुक केले.वाहन चालवताना वाहन चालकाला डुलकी लागल्यास त्याला सजग करणारी यंत्रणा म्हणजे मॅजिकल कार कॅप.जेव्हा वाहन चालक कोणतेही वाहन चालवण्यास स्टेआरिंगवर बसतात.
त्याचवेळी त्याला ही टोपी घालायला सांगितले जाते जेव्हा वाहन चालक वाहन चालवताना डुलकी घेतो तेव्हा पाईपमध्ये वीजपुरवठा खंडित करण्याकरता टाकलेली प्लॅस्टिकची पट्टी बाहेर येते.त्यानंतर विद्युत प्रवाह सुरू होतो आणि व्हायब्रेटरमध्ये निर्माण झालेल्या या कंपनांमुळे, इंडिकेटर लागल्याने व बजर वाजल्याने वाहन चालकाला संदेश मिळाल्यामुळे तो जागा होतो.हे अगदी स्वस्त दरात तयार होऊ शकते,लागणारे साहित्य परिसरातून उपलब्ध होते,घरी सहजतेने तयार करता येते,बस ट्रक लक्झरी बसेस यामध्ये सदर यंत्रणा लावल्याने मोठ्या प्रमाणात होणारी प्राणहानी टळू शकते.अवघ्या शंभर ते दोनशे रुपयात तयार होणाऱ्या या प्रतिकृतीमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात असे मनोगत राधिका देशमुख हिने व्यक्त केले. तिच्या अभिनव अशा प्रतिकृतीची निवड राज्यस्तरावर होणाऱ्या इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनीकरीता झाली आहे. समारोपिय कार्यक्रमात राधिका देशमुख व तिचे मार्गदर्शक शिक्षक गोपाल खाडे यांची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ.शिवलिंग पटवे,डॉ.राधा अतकरी संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर, प्रमुख अतिथी प्रवीण राठोड अधिव्याख्याता राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर तसेच डॉ. सुचेता पाटेकर शिक्षणाधिकारी,माध्यमिक जि.प. अकोला, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे यांच्यासह जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक प्रमोद टेकाडे,अध्यक्ष जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ डॉ. रवींद्र भास्कर,डॉ. आनंद अस्वार,डॉ.श्रीकृष्ण सावरकर, एन आय एफच्या क्रिष्णा विश्वास व दिव्या भारती राय ह्यांनी कौतुक केले. याच प्रदर्शनीत विद्यालयाची वैभवी खैरकर ही वर्ग सातवीची विद्यार्थिनी सहभागी झाली होती.तिच्या एफ एफ फ्रेंड ऑफ फार्मर अर्थात शेतकऱ्याचा मित्र या प्रतिकृतीची वाहवा झाली.तिने पाईपचा वापर करून शेतकऱ्याला उपयोगी पडतील अशा २५ विविध उपकरणे मांडली होती.ग्रामीण विद्यार्थ्यांचे सुयश पाहता सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.या प्रतिकृतीवर अधिक काम करून अशा प्रकारची यंत्रणा प्रत्येक गाडीत लागू व्हावी अशी इच्छा राधिका देशमुखचे मार्गदर्शक शिक्षक नीता तोडकर व गोपाल खाडे यांनी व्यक्त केली. विद्यार्थी व शिक्षकांचे यश पाहता मुख्याध्यापक तथा शिक्षक वृंदांनी कौतुक केले आहे.