जांभोरा येथे गुराख्याच्या अंगावरून धावली दीडशे गायी
दिडशे वर्षांची परंपरा कायम : जांभोरा येथील चित्तथरारक गोधन पुजा
भंडार/पालोरा / चंद्रकांत श्रीकोंडवाऱ
बलिप्रतिपदेच्या दिवशी विविध पद्धतीने गोधनाची पूजा सर्वत्र केली जाते. परंतु जमिनीवर पालथे झोपून अंगावरून संपूर्ण गोधन चालवून घेण्याची अनोखी परंपरा मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील शेतकऱ्यांनी १५० वर्षापासून अखंडितपणे सुरू ठेवली आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता पासून २ वाजता पर्यंत चाललेल्या या चित्त थरारक गोधन पूजेत जांभोरा येथील गुराखी विनायक सुरेश परतेकी वय ३५ यांच्या अंगावरून १५० गाईंचा कळप चालून गेल्यानंतरही तो सुखरूप असतो .
त्याला कोणतीही दुखापत व इजा होत नाही .गोमातेमुळेच आपण सर्व जिवंत आहोत तिचे ऋण फेडण्यासाठी आम्ही त्यांच्या चरणाखाली स्वतःला वाहून घेतो. यात काहीच वावगे नाही. हा अंधश्रद्धेचा प्रकार नाही .आमच्या पंणजोबा पासून ही प्रथा सुरू आहे. आणि ती कायम ठेवणे आमचे कर्तव्य आहे. असे तो हसमुखाने सांगतो. मोहाडी पासून २५ किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या टोकावर जंगल, पहाडाच्या कुशीत जांभोरा हे ४ हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात .या गावात १०० टक्के शेतकरी असून त्या सर्वाकडे मिळून १५० ते २०० गायी आहेत. शेती करणे हा मुख्य व्यवसाय या गावात आहे. गावातील सर्व गायी चरायला नेण्याचे काम पिढ्यांना पिढ्या परतेकी कुटुंबाकडे आहे.
१५१ वर्षापूर्वी गोधन अंगावरून चालण्याची प्रथा परतेकी कुटुंबाने सुरू केली. गावातील सर्व गाईंना आंघोळ घालली जाते. शिंग रंगवून व नवीन गेटे, दावे, बांधून त्यांना सजविले जाते. तांदळाची खीर गायीनां खाऊ घातल्यानंतर संपूर्ण गोधनाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते .ही मिरवणूक मुख्य चौकात आल्यानंतर गुराखी जमिनीवर पालथा झोपतो आणि संपूर्ण गोधन त्यांच्या अंगावरून जाते. तरी देखील गुराख्याला कुठलीही इजा होत नाही. हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील गावातील लोक जांभोरा येथे उपस्थित होतात .तसेच गावातील लोक याप्रसंगी सर्व भेदभाव विसरून गोधन पूजेला उपस्थित राहतात. १५० वर्षात गुराख्याला इजा झाल्याची घटना एऐकीवात नसल्याचे लोक सांगतात.