जालना येथील उपोषण कर्त्यानवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात निषेध मोर्चा.
जालना येथील घटनेचे पडसाद यवतमाळात
अरविंद वानखडे
यवतमाळ : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केली. या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळात संविधान चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ रास्तारोको आंदोलन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या फोटोला चपलानी मारहाण करून प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत होते. शुक्रवारी पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अचानक लाठीमार सुरू केला. या घटनेमुळे या भागात मोठे तणाव निर्माण झाले आहे. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर राज्यात त्याचे पडसाद उमटले असून आंदोलक यवतमाळ मध्ये आक्रमक झाले आहे. यवतमाळ येथील सर्व सामाजिक संघटनांनी संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून जिल्हाधिकारी कार्यालय वरती धडक मोर्चा काढुन सदर घटनेचा निषेध केला. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला चपलांनी मारहाण करून प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला.
जालन्यातील लाठी चार्ज मध्ये मराठा समाजाचे महिला, वृद्ध, मुलं मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत. या झालेल्या भ्याड लाठी हल्ल्याचे सखोल चौकशी करून संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. लाठी हल्ला करण्याचा आदेश देणा-यांची सखोल चौकशी करण्यात यावी, येणाऱ्या २४ तासांमध्ये संबंधित दोषीवर कारवाई करण्यात आली नाही तर संपूर्ण राज्यात मराठा समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदोलकांनी दिला आहे. या आंदोलनात
सकल मराठा समाज जिल्हा यवतमाळ, मराठा सेवा संघ जिल्हा यवतमाळ, सर्व शाखेय कुणबी मराठा समाज जिल्हा यवतमाळ, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा यवतमाळ, आव्हान सामाजिक संघटना यवतमाळ जिल्हा, संभाजी ब्रिगेड यवतमाळ जिल्हा, प्रहार संघटना यवतमाळ जिल्हा, जिजाऊ ब्रिगेड यवतमाळ जिल्हा वीर , भगतसिंग विद्यार्थी परिषद , दादा क्रीडा मंडळ, छत्रपती सेवा प्रतिष्ठान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यवतमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळ, इत्यादी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी अवधुतवाडी पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.