या कारणाने त्यांनी घरातच पुरला मृतदेह

वर्धा / नवप्रहार मीडिया नेटवर्क
गांधी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे.एका कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिला पैश्या अभावी घरातच खड्डा करून पुरल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या कुटुंबातील सदस्यांची मानसिक आणि आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. घटना आठवड्या पूर्वीची असल्याचे समजत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेवाग्राम येथील आदर्शनगरमधील एका कुटुंबात वृद्ध आई-वडील, बहीण भाऊ यांचा समावेश होता. सारे कुटुंब मानसिक आजाराने ग्रस्त असल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क ठेवला नाही. आजारपणामुळे रोज त्यांच्या घरातून ओरडण्याचा आवाज येत होता. तसेच त्यांच्यात वाद विवाद होत रहायचे.
या कुटुंबातील मुलगी तीन वर्षांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होती. तिच्या आजारपणावर उपचार झालेनाही. या मुलीचा ३ जुलै रोजी मृत्यू झाला. मुलगी मरण पावली, यावर तिच्या मनोरुग्ण आईवडिलांचा विश्वास बसत नव्हता. वृद्ध दांपत्य मृतदेहाजवळ रात्रभर बसून राहिले.
…म्हणून घरातच पुरला मृतदेह
दुसऱ्या दिवशी ४ जुलै रोजी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे कुठून आणायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. अखेर वडिलांनी मुलाच्या मदतीने घरातच पलंगाजवळ एक खड्डा खोदून मुलीचा मृतदेह पुरला.
आठवड्याभरापासून मुलगी घरात दिसून न आल्याने आसपासच्या नागरिकांना शंका आली. त्यामुळे त्यांनी सेवाग्राम पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक चंद्रकांत चकाटे, पीएसआय राहुल इटेकर कर्मचाऱ्यांसह गुरुवारी १३ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता घटनास्थळी पोहोचले. घटनेची वास्तविकता पाहून पोलिसही चक्रावून गेले.