पवारांच्या भांडणात आमदाराने घेतला हा निर्णय अंतर्मुख करणारा
मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क
अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. काका पुतण्याच्या वादात काय बोलावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.अश्यातच जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी पुढील निवडणूक न लढण्याचा आणि तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राजकारण्यांना अंतर्मुख करणारा आहे.
2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 8 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवारांच्या गटाने मुंबईमध्ये मेळावाही घेतला. आपल्याला 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. अजित पवारांकडे बहुतांश आमदारांचा पाठिंबा असला तरी काही आमदार अजूनही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहेत.
शरद पवारांसोबत जायचं का अजितदादांसोबत या संभ्रमामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. हा संभ्रम सुरू असतानाच राजकारणाला कंटाळून जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी यापुढे विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं आहे, तसंच सध्याच्या राष्ट्रवादीच्या फुटीवर तटस्थ भूमिका घेतली आहे. अतुल बेनके यांनी काही वेळापूर्वीच दिलीप वळसे पाटील यांची भेटत घेत त्यांची भूमिका मांडली होती, त्यानंतर काही वेळातच त्यांनी आपण विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं आहे. ज्यांना जिकडे जायचं तिकडे जाऊ द्या, मी तटस्थ राहणार असल्याचं अतुल बेनके यांनी जाहीर केलं आहे.
पाणी प्रश्नासाठी संघर्ष करू पण निवडणूक लढणार नाही, असा निर्णय बेनके यांनी जाहीर केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
राष्ट्रवादीची लढाई निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ही लढाई आता निवडणूक आयोगामध्ये पोहोचली आहे. अजित पवारांनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या सहीचं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगामध्ये सादर केलं आहे, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असून घड्याळ हे निवडणूक चिन्हही आपलंच असल्याचा दावा केला आहे. एवढच नाही तर पक्षाने अजित पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड केली असल्याचंही निवडणूक आयोगाला दिलेल्या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. ‘