विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी बस सेवा सुरू करा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या परिवहन विभागाला सूचना
नागपूर / प्रातिनिधि
ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने नियमित बस सेवा सुरू करण्याच्या सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग नागपूरच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर विभागीय विभागीय नियंत्रक प्रल्हाद घुले, उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे, विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे, नीलेश धारगावे, संतोष शेगोकार व जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापकांकडून आढावा घेतला. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. लवकरच शाळा सुरू होणार असून ग्रामीण भागातून शिक्षणासाठी मोठ्या संख्येत विद्यार्थी मोठ्या गावांत, तालुक्याच्या ठिकाणी व नागपूर शहरात येतात. मात्र शाळा-महाविद्यालयांच्या वेळेवर अनेक मार्गावर बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो ही बाब निदर्शनास आणून दिली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळांच्या वेळेवर बस सेवा सुरू करण्याची गरज व्यक्त करीत बस सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले.
सावनेर मार्गावर धावणाऱ्या सर्व बसेस महादुला सव्हिर्स रोडने सुरू करून महादुला व कोराडी बसस्थानकावर थांबा द्यावा. सावनेर डेपोतून चिचोली-पाढूर्णा-वरूड बसगाडी सुरू करावी. भिवापूर, कुही, कन्हान, बेला, कांद्री या ठिकाणी बसस्थान बांधावे, नागपूर-कळमेश्वर-कोहळी-मोहपा-रामगिरी-चाकडोह-खैरी-डोरली (भिंगारे) यामार्गे बस सेवा सुरू करावी, नागपूर लोहगड बस सेवेमधील अडचणी दूर करून ती नियमित सुरू करावी अशा सूचना केल्या. बस स्थानकावर असणाऱ्या असुविधा दूर करून प्रवाशांना सर्व सोयी देण्याचा प्रयत्न करावा.
*बससेची संख्या वाढविण्यासाठी प्रस्ताव द्या*
नागपूर जिल्ह्यात ६०० बसेसची संख्या मागील वर्षांत कमी होऊन ४०० झाली असल्याचे यावेळी समोर आले. तर काटोल आगाराच्या बसगाड्यांची संख्या ७५ हून कमी होऊन ५५ झाली आहे, यामुळे नियमित ४९ फेऱ्या पूर्ण होत नसल्याचे सांगून ७५ बसेसचा कोटा पूर्ण करण्याची गरज आहे. तर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी बसगाड्यांची संख्या वाढवून पूर्ववत करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. हा प्रस्ताव सादर केल्यावर त्याचा पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी श्री बावनकुळे यांनी दिले.