प्रबोधन, कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे विचार घराघरात पोहोचविल्या जाणार
350 वा शिवराज्याभिषेक दिन यावर्षी भव्य-दिव्य स्वरूपात साजरा होणार
सरकार व भाजपकडून सुरू आहे जोरदार तयारी
अकोला– हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त यावर्षी संपूर्ण राज्यभरात भव्य-दिव्य अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी राज्य सरकार व भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. गाव, तालुका, जिल्हा, विभाग अशा विविध स्तरांवर प्रबोधन व कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविल्या जाणार आहेत. अशी माहिती भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आली.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्यभरात राबविल्या जाणाऱ्या या विविध उपक्रमांतर्गत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय सहभागी होणार आहेत. प्रत्येक मराठी माणूस आणि महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील शिवप्रेमींचा श्वास असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे 350 वे वर्ष उत्साहात साजरे करण्याचा मानस असून भाजपा, शिवसेना युतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नवीन पिढीला कळावे व ते जगभर पोहोचावे यासाठी येत्या 2 जून रोजी रायगडावर राज्य शासनाकडून आयोजित कार्यक्रमांचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. शिवप्रेमी नागरिकांना सोबत घेऊन हा सोहळा भव्य-दिव्य करण्याच्या दृष्टीने शासनाची व राजे संभाजी महाराज यांच्या नेतृत्वातील व भाजपा शिवसेनेची शिस्तबद्ध तयारी सुरू आहे. या सोहळ्यात लाखो शिवप्रेमी सहभागी होतील, असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम व विचार नवीन पिढीला कळावे यासाठी हे उपक्रम राबविण्यात येत असून छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि ज्या वाघांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे लंडनहून परत आणण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही भाजपकडून सांगण्यात आले. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जावा असा मनोदय महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्रीयन नागरिकांचा असल्याचे आ. सावरकर यांनी सांगितले.
1 जून ते 7 जून दरम्यान रायगडाच्या पायथ्याशी विविध कार्यक्रम साजरे होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रांचे गेट वे ऑफ इंडिया येथे प्रदर्शन भरविण्यात येणार असून गाव, तालुका, जिल्हा व विभाग पातळीवर प्रबोधनकार, कीर्तनकार यांच्या माध्यमातून महाराजांचे विचार घराघरात पोहोचविल्या जातील. एक कोटी शिवभक्त राज्यात तयार करण्याचा मानस देखील भाजपा शिवसेना सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. सुधीर मुनगंटीवार यांचा असून प्रत्येक स्तरावर समित्या तयार करून त्यामध्ये सर्वांना समाविष्ट करून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा 350 वा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व शिवप्रेमी भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आ. रणधीर सावरकर यांनी केले आहे.