अमरावतीच्या युवकाचा पुण्यात डोंगराच्या पायथ्याशी सापडला मृतदेह
गळा चिरून केली निर्घुन हत्या
– शिवाजीनगरात शोककळा
अमरावती : शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी गौरव सुरेश उदासी (35, ह.मु. खराडी, मूळचा रा. शिवाजीनगर अमरावती) नामक युवकाची गळा चिरून निर्घुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. गौरवचा मृतदेह लोहगाव बावडी रोडनजीक रोहन अभिलाषा सोसायटी समोरील डोंगराच्या पायथ्याजवळ सापडला आहे. वाघोली येथे एका आयटी कंपनीत तो कार्यरत होता. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वाघोली नजीक लोहगाव बावडी रोड येथे डोंगराच्या पायथ्याजवळ एका व्यक्तीचा गळा चिरलेला मृतदेह मिळून आल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली होती. तात्काळ घटनास्थळी लोणीकंद पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली असता एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेला मृतदेह घटनास्थळी मिळून आला. सोबत दुचाकी क्रमांक एम एच 27 डीजी 0389) देखील मिळून आलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव हा खराडी येथील आयटी कंपनीत नोकरीस आहे. तो खराडी येथे मित्रांसमवेत पीजी मध्ये राहतो. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जेवायला जातो असे मित्रांना सांगून गौरव निघाला होता. मात्र रात्री पुन्हा तो आला नाही. दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गौरवचा गळा चिरलेला मृतदेह मिळून आला. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी शहरातील गाडगेनगर पोलिसांना घटनेची माहिती उदासी परिवाराला देण्याचे सांगितले होते. दरम्यान गाडगेनगर पोलिसांनी उदासी परिवाराला माहिती दिली आहे. घटनास्थळी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. घटनास्थळी न्याय वैद्यकीय पथक तसेच श्वानपथक यांना देखील पाचारण करण्यात आले होते. गौरवचा अत्यंत अमानुषपणे गळा चिरून निर्गुणपणे खून का करण्यात आला याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. लोणीकंद पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.