अरे बाबो नोकरी न करताही कंपनीने पगार दिल्याचा दावा
तर त्यावर लावण्यात आले तर्कवितर्क
मुंबई – नवप्रहार न्यूज नेटवर्क
एकीकडे जगात कथित रित्या मंदीचे सावट असल्याचे भासवत अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची चटई सुरू केली आहे. अनेक नॅशनल आणि मल्टिनॅशनल कंपन्या ले ऑफ ला सामोरी जात आहेत. मागच्या काही महिन्यांत हजारो कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. याचदरम्यान, मेटा आणि सेल्सफोर्स सारख्या कंपन्यांमधील कर्मचार्यांना कोणतंही काम दिलं जात नसतानाही मोठ्या आकड्यांचा पगार मिळत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मॅडलिन मचाडो एक करिअर कोच आहेत. त्यांनी नुकताच एक टिकटॉक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात दावा केला आहे की मेटामध्ये काम करत असताना सहा महिने काहीही काम न केल्याबद्दल त्यांना 190,000 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास 1.5 कोटी रुपये पगार मिळाला आहे. “मला वाटतं की यापैकी बऱ्याच कंपन्यांना काम हवं होतं, परंतु तिथे पुरेसं काम नव्हतं,” असं त्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’शी बोलताना म्हणाल्या.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेट युजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी मॅडलिन यांनी कोणतंही काम न करता पैसे कमवल्याबद्दल व त्याबद्दल जाहीरपणे सांगितल्याबद्दल टीका केली, तर काही युजर मात्र यावर हसत आहेत. एका युजरनी म्हटलंय, ‘माझ्या दृष्टिने ते ठीक आहे तू फक्त बसून, माझं काम कर आणि मला काही करावंसं वाटलंच तर मी मातीकामाचे क्लासेस सुरू करेन.’ काहींनी काहीच न करता पगार देणाऱ्या नोकऱ्या कुठे मिळतात, असं विचारलं.
तर, काहींनी मात्र मेटामधील ले-ऑफचा संदर्भ देत मॅडलिनवर टीका केली. तसंच मेटावरही निशाणा साधला. एकीकडे अनेक गरजू कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं, तर दुसरीकडे मात्र काहीच न करताही कंपनीने एका कर्मचाऱ्याला तब्बल दीड कोटी रुपये पगार दिला. दरम्यान, मेटा कंपनीच्या आणखी एका माजी कर्मचार्याने नोकरीच्या पद्धतींचे वर्णन “पोकेमॉन कार्ड” गोळा करण्यासारखंच आहे असं केलं आहे, ज्यात कर्मचार्यांच्या नोकरीच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं म्हटलंय.
35 वर्षीय ब्रिटनी लेव्ही यांना एप्रिल 2022 मेटाने नियुक्त केलं होतं. अलीकडेच एका TikTok व्हिडिओमध्ये तिने कंपनीतील तिचा अनुभव शेअर केला, ज्यात “काम शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला,” असं ती म्हणते. ‘द जर्नल’च्या म्हणण्यानुसार, मागच्या काही आठवड्यांत अनेक माजी टेक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर जास्त काम न करता पगार मिळण्याचे त्यांचे अनुभव शेअर केले आहेत, यापैकी बर्याच पोस्ट व्हायरल झाल्या आहेत आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान, टेक इंडस्ट्री एक्सपर्ट म्हणाले की टेक-आधारित उपायांच्या वाढत्या मागणीला कायम ठेवण्यासाठी टेक कंपन्यांनी महामारीच्या काळात जास्त कर्मचारी कामावर घेतले असू शकतात. अॅडल्ट-थीम रिटेलर लव्हर्स लेनचे सह-संस्थापक मायकेल ऑलमंड यांनी निदर्शनास आणून दिलं की “लोक घर सोडू शकत नव्हते त्यामुळे टेक्नॉलॉजीला ती पोकळी भरून काढावी लागली आणि सर्व प्रकारच्या कंपन्यांना टेक्नॉलॉजीवर आधारित उपायांमध्ये गुंतवणूक करावी लागली.”