अपघात

पत्नी,मुलगी आणि भाच्याने मिळून वाजवला गेम 

Spread the love

 

अपघात दाखविण्याचा प्रयत्न पण पोलिसांच्या तपासात भलतेच सत्य उघड 

मेहसाणा (गुजरात ) / विशेष प्रतिनिधी 

पोलिसांनी मनावर घेतले तर ते काय करू शकतात याची प्रचिती अनेकदा येते. पोलिसांबद्दल मिश्किलपणे असे म्हटल्या जाते की ‘ त्यांनी मनावर घेतले तर ते कबरीतून सुद्धा सत्य बाहेर आणतात ‘ या प्ररकरणात त्यांनी हे सिद्ध केले आहे. एका पूर्वनियोजित हत्या प्रकरणाला अपघात दाखविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. आणि हत्येचा कटात सहभागी पत्नी, मुलगी आणि भाच्याला अटक केली आहे.

या प्रकरणात मेडिकल स्टोअर चालवणारे विनोदभाई पटेल यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. या तपासात विनोदभाई यांच्या पत्नी रीटाबेन, मुलगी आणि सख्खा भाचा विमल पटेल यांनी मिळून हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

विनोदभाई यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारी कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोदभाई पटेल हे विजापूर येथे मेडिकल स्टोअर चालवत होते. नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते अॅक्टिव्हावरून घरी जात असताना आनंदपुरा चौकाजवळ एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा रस्ता अपघात असल्याचे दिसत होते. मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संबंधित कार केवळ घटनेच्या दिवशीच नव्हे, तर त्याआधी अनेक दिवस विनोदभाई यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा अचानक झालेला अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचा संशय अधिक बळावला.

पतीची हत्या करण्यासाठी भाच्याला 50 हजार रुपये देण्याचे आश्वासन

त्यानंतर पोलिसांनी मोबाइल लोकेशन, तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे तपास पुढे नेला. पोलिसांच्या दाव्यानुसार, कार चालवणारा युवक हा विनोदभाई यांच्या पत्नी रीटाबेन यांचा सख्खा भाचा विमल पटेल होता. रीटाबेन यांनी पतीची हत्या करण्यासाठी भाच्याला 50 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. तसेच नंबर प्लेट नसलेल्या कारने धडक देऊन हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्याचा कट रचण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण कटात विनोदभाई यांची मुलगीही सहभागी होती. ती वडिलांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांची माहिती भाच्यापर्यंत पोहोचवत होती. घटनेच्या दिवशीही अशाच प्रकारे लोकेशनची माहिती दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, या कटामागे दोन प्रमुख कारणे समोर आली आहेत. पहिले म्हणजे विनोदभाई यांच्या नावावरील 10 लाख रुपयांचा जीवन विमा आणि दुसरे म्हणजे दीर्घकाळ सुरू असलेला कौटुंबिक वाद. मृताचे बहीण सूर्याबेन पटेल यांनीही घरात वारंवार वाद होत असल्याचे सांगितले असून, घटनेच्या काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांच्या वागण्यात अचानक बदल झाल्याचा दावा केला आहे. तपास अधिकारी डीएसपी दिनेशसिंह चौहान यांनी सांगितले की, सुरुवातीला हा रस्ता अपघात वाटत होता, मात्र सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल डेटा आणि इतर तांत्रिक पुराव्यांमुळे संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपी पत्नी, मुलगी आणि भाचा विमल पटेल यांना अटक केली असून हत्येसाठी वापरण्यात आलेली कारही जप्त केली आहे. या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास सध्या सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close