लहान बहिणी समोरच मोठ्या बहिणीवर बलात्कार करून हत्या ;आरोपी अल्पवयीन

जळगाव / नवप्रहार डेस्क
शेतातून घरी परतणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून एका नराधमाने मोठ्या बहिणीवर लहान बहिणी समोर कपाशीच्या शेतात नेऊन बलात्कार केला. ही घटना आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या लहान बहिणीने गावाकडे धाव घेत गावकऱ्यांना हा प्रकार सांगितला. गावकरी घटनास्थळी पोहचले तेव्हा नराधम तेथून पसार झाला होता. आणि मुलीचा विवस्त्र मृतदेह शेतात पडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली. यासाठी त्यांनी रविवारी चोपडा शहरात मोर्चा देखील काढला होता. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी देखील अल्पवयीन असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणी शनिवारी शेतात गेल्या होत्या. तेथून दोघीही परतत असताना वाटेतच अल्पवयीन आरोपीने त्यांना अडवलं. यातील मोठ्या बहिणीला मारहाण करत त्याने जवळच्याच शेतात नेलं.
तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार (Crime News) केला. आरोपीने इतक्यावरच न थांबता पीडितेची दगडाने ठेचून हत्या देखील केली. हा संपूर्ण प्रकार पीडितेच्या लहान बहिणीने आपल्या डोळ्यासमोर घडला. तिने गावात धाव घेत आरडाओरड करत या घडलेला प्रकार सांगितला.
त्यानंतर गावकऱ्यांनी शेताच्या दिशेने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाला होता. गावकऱ्यांनी पीडित मुलीची शोधाशोध केली असता जवळच असलेल्या एका कापसाच्या शेतामध्ये तिचा मृतदेह निवस्त्र अवस्थेत आढळून आला.
त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचमाना करून पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला.
जळगावहून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली. आरोपीला विरवाडे -आडगाव रस्त्यावरून अटक करण्यात आली. सध्या पोलीस घटनेचा सखोल तपास करीत आहेत. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जातोय.