महिला कीर्तनकारच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश

या कारणाने केली हत्या
वैजापूर / नवप्रहार ब्युरो
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील आश्रमात झालेल्या महिला कीर्तनकाराच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मध्यप्रदेश मधून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. घटना 27जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती.
ह.भ.प संगीताताई पवार असं महिला किर्तनकाराचं नाव होतं. याच हत्ये प्रकरणी आता पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या दोन नराधमांना आता पोलिसांनी अटक केली आहे.
फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला होता. ज्यानंतर पोलिसांना काही ठोस पुरावे गोळा करत आरोपीचा शोध सुरू केला होता.
नेमके कसे सापडले आरोपी?
याच हत्येप्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग देत आज (2 जुलै) हत्येतील दोन आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपी हे मूळचे मध्य प्रदेशातील आहेत. दोघेही संभाजीनगर जिल्ह्यात शेतमजूर म्हणून काम करायचे.
मंदिराच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोने-चांदीचे दागिने असल्याचे त्यांना वाटले. म्हणूनच त्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून झोपलेल्या कीर्तनकार महिलेची आधी हत्या केली आणि नंतर मंदिरातील पैसे आणि सोने-चांदीचे दागिने चोरून पळ काढला होता.
कीर्तनकार महिलेच्या हत्येनंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली होती. पोलिसांनी चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही सर्वत्र जारी केलं होतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा एक व्यक्ती एका गावातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
ज्यानंतर संभाजीनगर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने संशयिताला ताब्यात घेतलं. ज्यानंतर त्यांनी त्याची कसून चौकशी केली. यावेळी आपणच महिला किर्तनकाराची हत्या केली अशी कबुली त्याने दिली. गुन्हा कबूल केल्यानंतर त्याने त्याच्या साथीदाराबाबत देखील माहिती दिली. ज्यानंतर संभाजीनगर पोलिसांनी मध्य प्रदेशात पळून जाणाऱ्या दुसऱ्या आरोपीलाही तात्काळ अटक केली.