वाचा कुठे आहे असं गाव जिथले वाहन कधीच होत नाही बंद
मुंबई / नवप्रहार डेस्क
जग हे अनेक रहस्याने भरलेले आहे. एखाद्या गोष्टी बद्दल जेव्हा आपण वाचतो किंवा ऐकतो तेव्हा आपणाला त्याबद्दल कुतूहल वाटते. आणि त्यानंतर आपण त्या गोष्टीत जास्त रस घेतो किंवा ती माहिती इतरांना पाठवतो. आज आम्ही तुम्हाला एका अश्या गावाबद्दल सांगणार आहोत जेथे वाहने सुरूच असतात. म्हणजेच त्यांचे इंजिन बंद होत नाही.
रशियातलं याकुत्स्क नावाचं गाव जगातलं सगळ्यात थंड ठिकाण मानलं जातं. इथं मानवी वस्ती आढळते. इथलं किमान तापमान उणे 83 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. याकुत्स्क गाव सायबेरियाच्या वाळवंटात येतं. त्या ठिकाणी उणे 40 अंश सेल्सिअस तापमानाला उष्ण दुपार मानली जाते. उणे 68 अंश सेल्सिअस तापमान हे सहन करण्याजोगं मानलं जातं. इथलं जनजीवन म्हणजे डीप फ्रीजरमध्ये राहिल्यासारखंच आहे. प्रत्येक वस्तू बर्फ आणि धुक्यानं वेढलेली आहे. इथं राहणाऱ्या लोकांचं राहणीमान खूप आव्हानात्मक आहे. त्याबद्दल वाचूनही आपल्याला खूप आश्चर्य वाटेल. रशियाची राजधानी मॉस्कोपासून 5000 किलोमीटर अंतरावर पूर्वेला याकुत्स्क हे गाव आहे.
गाड्या 24 तास सुरूच असतात
असं सांगितलं जातं, की हे ठिकाण इतकं थंड आहे, की इथं वाहनं 24 तास सुरू करूनच ठेवावी लागतात. याकुत्स्क ज्या प्रांताअंतर्गत येतं, त्याचं नाव आहे ओमायकॉन. थंडीमध्ये इथलं सरासरी तापमान उणे 50 अंश सेल्सिअसपर्यंत असतं. असं तापमान असताना इथं वाहनं कधीच बंद करून ठेवली जात नाहीत. याचं कारणसुद्धा खूप रोचक आहे. कारण इथल्या माणसांनी त्यांची वाहनं बंद केली तर ती पुन्हा चालू करण्यासाठी त्यांना पुढचा उन्हाळा येईपर्यंत वाट पाहावी लागेल. त्यामुळं शेवटी ही जोखीम कोणीही पत्करत नाही आणि वाहनं दिवसरात्र सुरू ठेवली जातात.
उन्हाळ्यातलं तापमान उणे 10
इथे उन्हाळ्यातलं तापमान उणे 5 पासून 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असतं. थंडीत इथलं तापमान उणे 50 अंश सेल्सिअसपर्यंत जातं. पुरेसे गरम कपडे परिधान न करता तुम्ही बाहेर पडलात तर नक्कीच तुम्ही अक्षरशः गोठू शकता. दिवसभर वाहणारे गार वारे आणि क्षणार्धात तापमान कमी होणं, ही इथली सगळ्यात मोठी समस्या आहे. वर्षातले बहुतांश दिवस इथले रस्ते बर्फाच्छादितच असतात. त्यामुळंच याकुत्स्कमध्ये राहणं सोपं नाहीये. ते धोकादायक आहे.
याकुत्स्कमध्ये जनजीवनावर संकटं
याकुत्स्कमध्ये सामान्य जनजीवन जगणं हे जवळपास अशक्य आहे. अन्न मिळवणं हे इथल्या लोकांसाठी खूप आव्हानात्मक आहे. काळानुरूप काही बदल झाल्यानंतर आता थोडा दिलासा मिळाला आहे; पण अजूनही हे काम खूप कठीण आहे. इथल्या लोकांना आता पॅकेटमधलं अन्न उपलब्ध होऊ लागलं आहे. कठीण प्रसंगांमध्ये हे अन्न त्यांना उपयोगी पडतं. थंडी कमी झाल्यानंतर रशियातल्या लीना नदीच्या काठावर वसलेल्या या गावामध्ये दुकानाबाहेर मासे विकायला ठेवले जातात आणि ते अनेक महिने ताजे राहू शकतात. कारण इथं सतत बर्फवृष्टी होत असते. मासे हे इथल्या लोकांचं मुख्य अन्न आहे.
घर गरम ठेवणं हे मुख्य काम
आपल्यापैकी अनेकांना इथं काहीसा वेळ घालवणंही खूप कठीण असेल; पण द सनच्या वृत्तानुसार रशियाचं याकुत्स्क गाव ही एक खूप सुंदर जागा आहे. सकाळी उठल्यानंतर या लोकांचं सगळ्यात पहिलं काम म्हणजे लाकडं गोळा करून एकत्र ठेवणं. मग ती लाकडं एकत्र करून त्याची शेकोटी करायची आणि घरातलं वातावरण राहण्यायोग करून ठेवायचं. अगदी सर्वांत थंड काळातसुद्धा टिकून राहू शकेल, अशा काँक्रीटचा वापर करूनच इथली घरं तयार केली जातात. बर्फवृष्टी सुरू असताना त्या नऊ महिन्यांच्या काळात ही घरं लाकडाचा वापर करून गरम करून ठेवली जातात.
जेव्हा तापमान शून्यापासून खूप खाली उतरू लागतं, तेव्हा घर गरम करण्याबरोबरच पिण्याचं पाणी शोधणं हेसुद्धा इथलं एक कठीण काम आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी इथले लोक एकावर एक असे जास्त कपडे परिधान करतात. फर किंवा जाड लोकरीचा वापर करून शिवलेले कपडे इथले लोक घालतात. जाड बूट घालूनच यांना वावरावं लागतं. या बुटांशिवाय एक क्षणही वावरता येत नाही.