आंघोळी साठी कोणती वेळ आहे चांगली
आपल्या देशात सकाळी आंघोळ करणे आणि त्यानंतर पूजा विधी आटोपून कामाला किंवा व्यवसायावर जाणे शुभ मानले जाते. पण काही देश असे आहेत जेथे लोकं रात्री आंघोळ करतात. चला तर जाणून घेऊ या कोणत्या देशातील लोकं कधी आंघोळ करतात.
काही देशांमधले लोक सकाळऐवजी रात्री आंघोळ करतात. आंघोळीच्या योग्य वेळेबाबत वैज्ञानिकांचीदेखील मतमतांतरं आहेत.
जपानमधील लोकांना प्राचीन काळापासून रात्री अंघोळ करण्याची सवय आहे. असं मानलं जातं, की रात्री अंघोळ केल्याने दिवसभर शरीरावर साचलेली विषारी द्रव्यं आणि घाण निघून जाते आणि झोपही चांगली येते. जपानी आंघोळ संस्कृतीमध्ये ऑनसेन (हॉट स्प्रिंग्ज) आणि ऑफरो (बाथटब) यांचा समावेश आहे. आंघोळीच्या विधीसाठी टबमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अगोदर शरीर पूर्णपणे स्वच्छ केलं जातं. टबमधलं पाणी सहसा उबदार असतं. त्यामुळे थकलेल्या व्यक्तीला आराम मिळतो.
जपानी लोक शांत झोपेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी रात्री आंघोळ करतात. जपानी लोकांना असं वाटतं, की रात्री आंघोळ केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात. आंघोळीचा विधी जपानी परंपरांमध्ये खोलवर रुजलेला आहे. जपानी लोकांची आंघोळ आणि त्यांच्या कार्यसंस्कृतीचा फार जवळचा संबंध आहे. बऱ्याच जपानी कामगारांचे कामाचे तास जास्त आणि तणावपूर्ण असतात. सहसा ते रात्री उशिरापर्यंत काम करतात. झोपायच्या आधी आंघोळ करून ते आपल्या शरीराला काम संपल्याची आणि विश्रांती घेण्याची सूचना देतात. दक्षिण कोरियामधले लोकदेखील रात्री आंघोळ करतात. दिवसभर काम करून रात्री आंघोळ केल्याने थकवा निघून जातो, असं त्यांचं म्हणणं आहे.
चीनमध्ये कोणत्या वेळी आंघोळ केली जाते?
चिनी संस्कृतीत रात्रीच्या आंघोळीला दैनंदिन स्वच्छतेचा अत्यावश्यक भाग मानलं जातं. रात्री आंघोळ केल्याने दिवसभर मनात जमा झालेल्या नकारात्मक शक्तींसह तणाव दूर होतो. यामुळे शरीर ताजंतवानं होतं आणि रात्री शांत झोप येते. चीनमधलं हवामान आर्द्र आणि उष्णकटिबंधीय आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना खूप घाम येतो. परिणामी त्वचेवर बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. झोपताना आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ राहतं आणि संसर्गाचा प्रसार रोखण्यासही मदत होते.
ब्राझिलियन लोक वारंवार आंघोळ करतात
लॅटिन अमेरिकेत, विशेषतः ब्राझील, मेक्सिको आणि कोलंबियामधले लोक आठवड्यातून सरासरी 8 ते 12 वेळा आंघोळ करतात. लॅटिन (दक्षिण) अमेरिकेतलं वातावरण काहीसं उष्ण असल्यामुळे आणि तिथले स्वच्छतेचे मापदंड खूप उच्च असल्यामुळे ते लोक वारंवार आंघोळ करतात. ब्राझिलियन लोक सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा किंवा शरीरश्रमाची कामं केल्यानंतर एकदा आंघोळ करतात. तिथे ही बाब सामान्य आहे.
युनायटेड स्टेट्स, युरोप आणि कॅनडासारख्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये ताजंतवानं होण्यासाठी आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी सकाळीच आंघोळ केली जाते. भारताप्रमाणेच प्राचीन इजिप्तमध्येदेखील आंघोळीची कृती ही, शुद्धीकरण, देवतांची पूजा आणि उपासनेशी संबंधित मानली जाते. इस्लामिक संस्कृतीमध्येदेखील सकाळी आंघोळीला प्राधान्य दिलं जातं.
विज्ञान काय म्हणतं?
तज्ज्ञांच्या मते, रात्री आंघोळ करणं आरोग्यासाठी जास्त चांगलं आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने शरीर ताजंतवानं होते. रात्री अंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा काही मिनिटांत नाहीसा होतो आणि झोपही चांगली लागते.