तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे काय ? असो किंवा नसो ही बातमी वाचाच
पुनर्जन्मावर काही चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.मनोहर कहानिया किंवा सत्य कथा अश्या पुस्तकातून सुद्धा पुनर्जन्माच्या स्टोरीज प्रसिद्ध होत असतात. आता उत्तरप्रदेश च्या मैनपुरीत पुनर्जन्माचा दावा केला जात आहे. त्यावर काही लोक विश्वास ठेवत आहेत तर काहींना यावर विश्वास नाही. तसेही एकविसाव्या शतकात पुनर्जन्माच्या गोष्टीवर लगेच विश्वास बसणे कठीण आहे. पण उत्तर प्रदेशात मैनपुरीतील पुनर्जन्माच्या गोष्टीची भरपूर चर्चा होत असल्याचे चित्र आहे.
गोष्टीची सुरुवात मैनपुरीतून झाली. आठ वर्षांचा आर्यन दुबे नावाचा मुलगा अचानक त्याच्या घरच्यांना माझा पुनर्जन्म झाला आहे, असं काही तरी सांगू लागला. तो स्वतःच्या आईला त्याची मुलगी म्हणू लागला. या प्रकाराने घरातली मंडळी चक्रावली.आर्यन त्याच्या आईच्या वडिलांविषयी म्हणजेच आजोबांविषयी बोलत होता. तो जे सांगत होता ते बघून आईला आश्चर्य वाटू लागले. अखेर आर्यनच्या आईने माहेरच्यांशी संपर्क साधला आणि त्यांना घरी बोलावले. आर्यनच्या आईच्या माहेरचे सदस्य आले तेव्हा त्यांच्यासमोरही आर्यन माझा पुनर्जन्म झाला आहे, असं सांगू लागला.
आर्यनचे म्हणणे होते की तो मागच्या जन्मात मनोज मिश्रा होता. मनोज मिश्रा शेतात काम करत होते. तिथे एका बिळात पाणी जात असल्याचे त्यांना आढळले. मनोज यांनी बिळावर माती लोटून ते बिळ बंद करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी एका नागीणीने त्यांच्या पायाला दंश केला. या सर्पदंशामुळे मनोज यांची दृष्टी गेली आणि त्यांची तब्येत ढासळली. घरच्यांनी मनोज यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी तपासणी करून सर्पदंशाने मनोज यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी मनोज यांची रंजना नावाची मुलगी गरोदर होती. रंजनाचे दिवस भरत आले होते. दिवस कार्य आटोपण्याच्या आधीच रंजनाने बाळाला जन्म दिला. हे बाळ म्हणजे मी आर्यन दुबे. रंजना या जन्मात माझी आई असली तरी मागच्या जन्मात माझी मुलगी होती; असे आर्यनने सांगितले.
आर्यनने मनोज यांच्या घरातील इतर सदस्यांविषयी व्यवस्थित सांगितले. विशेष म्हणजे मनोज यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्या बँक खात्यात किती रक्कम होती याची माहिती आर्यनने व्यवस्थित सांगितली. यामुळे आर्यन हा खरच मनोज मिश्रा यांचा पुनर्जन्म आहे, असे मत काही स्थानिक व्यक्त करत आहेत. काहींचा मात्र या प्रकारावर अद्याप विश्वास नाही. कोणीतरी आर्यनला लहान वयातच व्यवस्थित पढवले आहे, अशी शंका काही नागरिक व्यक्त करत आहेत.
आर्यनने मनोज मिश्रा यांचे दोन मुलगे, रंजनाचे भाऊ अनुज आणि अजय यांच्याबाबतही माहिती दिली आहे. अनुजला केस वाढवणे आवडते पण आता वयाचा विचार करून अनुजने केस व्यवस्थित कापणे योग्य ठरेल. त्याने मोबाईलवर जास्त वेळ वाया घालवणे योग्य नाही; असेही आर्यन म्हणाला. आता आर्यन सांगत असलेली पुनर्जन्माची गोष्ट खरी आहे की त्याला कोणी पढवले आहे, हे सांगणे सध्या कठीण आहे. पण आर्यनची पुनर्जन्माची गोष्ट वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे.