पूल 18 आठवड्याच्या आत वाहून गेला; 18 लाखांचा भ्रष्टाचार उघड
नवप्रहार डेस्क – हंसराज भंडारा.
मोहाडी तालुक्यातील चीचखेडा येथे मनरेगा योजनेअंतर्गत स्मशानभूमीवरील नाल्यावर बांधण्यात आलेले तब्बल 18,73,416 रुपये किमतीचे मोरी बांधकाम दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरामध्ये वाहून गेले. हे काम 2 एप्रिल 2024 रोजी सुरू झाले होते व 10 जून 2024 रोजी पूर्ण झाले.
गावकऱ्यांनी यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले असून हे जनतेच्या पैशाचे अपव्यय असल्याचे म्हटले आहे. बांधकाम सुरू असतानाच गावकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायत सचिव आणि अभियंत्यांकडे तोंडी तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि आता एक महिन्याआधी तयार झालेला पूल पुरात वाहून गेला.
राजकीय कार्यकर्ते कॉम्रेड वैभव चोपकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रा. प. सदस्य रूपेश सिंदपुरे, अनिल गाढवे यांच्यासह गावकऱ्यांनी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सार्वजनिक पैशांचा अपहार आणि बांधकामाकडे गुन्हेगारी दुर्लक्ष केल्याबद्दल सखोल चौकशीची मागणी केली आहे. जर एका आठवड्यात कारवाई झाली नाही, तर प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.