सेल्फीचा नादात तरुण पाय घसरून धरणात पडला…
ग्वाल्हेर / नवप्रहार डेस्क
सेल्फीच्या नादात अनेकांनी स्वतःच संकट ओढवून घेत जीव गमावल्याच्या अनेक घटना घडतात. तरी देखील लोकांना सेल्फीचा मोह आवरता येत नाही. पावसाळ्यात अनेक लोक नैसर्गिक गोष्टीचा आनंद लुटण्यासाठी धबधबे, धरण आणि विहंगम दृश्य असलेल्या ठिकाणी जातात. आणि त्या ठिकाणी धिंगामस्ती करतांना घडलेल्या चुकीमुळे धोक्यात येतात किंवा आपला जीव गमावतात. ग्वाल्हेर च्या तिघरा धरणावर पावसाचा आनंद लुटण्यासाठी आलेला तरूण धरणात पडल्याची घटना घडली आहे.
पावसामुळे सर्वत्र वातावरण चांगले असून, धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. या सर्व वातावरणामुळे मोहित होऊन डोंगरदऱ्यांवर पोहोचलेले युवक, युवती सेल्फीसाठी नको ते धाडस करीत आहेत.
अनेक पर्यटक धोकादायक ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळते. नुकत्याच अशा अनेक घटना घडल्या आहेत की, ज्यात पाण्यात मजा करताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे. आता असेच एक प्रकरण मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून समोर आले आहे. तेथे एक व्यक्ती सेल्फीच्या नादात धरणात पडली असल्याची माहिती समोर आली आहे. त्या प्रकरणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
ग्वाल्हेर येथील तिघरा धरणाला भेट देण्यासाठी आलेली एक व्यक्ती घसरून पाण्यात पडली. तो सेल्फी घेत असताना बेसावध राहिल्याने त्याचा पाय घसरला आणि तो थेट धरणात पडला, असे सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी तेथे सुदैवाने अनेक लोक उपस्थित होते. त्या व्यक्तीला वाचविण्यासाठी सर्वांनी तातडीने प्रयत्न सुरू केले.
‘त्याला’ वाचविण्यासाठी अनेकांच्या पाण्यात उड्या
तिघरा धरणाला भेट देण्यासाठी अनेक लोक आले होते. सेल्फीच्या मोहात त्या व्यक्तीला पाण्यात पडताना पाहून काही लोकांनी त्याला वाचविण्यासाठी लगेच पाण्यात उड्या घेतल्या. इतर लोकांनी दोरीद्वारे त्याला बाहेर काढण्यास सुरुवात केली. प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर त्या व्यक्तीला दोरीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. त्याची प्रकृती अल्पावधीतच खालावली होती.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काही लोकांनी त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली; तर काही लोक दोरीच्या साह्याने त्या व्यक्तीला धरणातून बाहेर काढत आहेत. लोकांच्या तत्परतेमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले. त्यानंतर लोकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तिघरा धरण पूर्णपणे काठोकाठ भरले आहे.
ग्वाल्हेर शहराला तिघरा धरणातूनच पाणीपुरवठा केला जातो. तिघरा धरण काठोकाठ भरल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी धरणाला भेट देऊन तिघरा जलाशयाच्या देखभालीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पाण्याची पातळी वाढल्यास आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, असेही सांगण्यात आले.