अखेर वळसे पाटील यांनी मौन सोडले

शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या मंचर मतदारसंघात विराट सभा घेऊन एकच धुरळा उडवून दिला. गद्दारांचा पाडा, असं म्हणत त्यांनी दिलीप वळसे पाटलांवर थेट हल्ला चढवला. अखेरीस आज दिलीप वळसेंनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.
‘मी गद्दारी जर केलीच नाही तर त्याच्याबद्दल काय बोलायचं. हा पक्षाचा एकत्रित निर्णय आहे, त्या निर्णयाच्या सोबत मी आहे त्यामुळे गद्दारीचा प्रश्न येतोच कुठे? असं म्हणत वळसेंनी शरद पवारांच्या टीकेवर बोलण्याचं टाळलं.
तसंच, ‘माझी निवडणूक कोणाच्या विरोधात नाही. पवार साहेबांच्या विरोधात तर अजिबात नाही. या ठिकाणच्या डिंभे धरणाच्या पाण्याच्या संदर्भात ही निवडणूक आहे. त्याच प्रश्नावर मी निवडणूक लढवतोय’ असंही वळसे म्हणाले.
डिंभे धरण बोगद्यावर शरद पवार काही बोलले नाही, पण काल रोहित पवार काही बोललेत. खासदार निलेश लंके काही बोललेत. आज घनश्याम शेलार बोललेत, आणि या सगळ्यांनी सांगितलंय बोगदा होणार म्हणजे होणार आणि आपला त्याला विरोध आहे. बोगद्याला तुमचा विरोध, म्हणून तुम्हाला त्रास होतोय. त्रासाचा प्रश्न येत नाही आपण बोगद्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मला कुठल्याही परिणामाची चिंता न करता विरोध राहील. उद्या मी निवडून येऊ अगर न येऊ. कुठल्याही परिणामाची चिंता न करता माझ्या तालुक्यातील जनतेचे हक्काचं पाणी सुरक्षित ठेवण्याची मी भूमिका घेतली आहे, असंही वळसे पाटील म्हणाले.