उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी ; भाजप चा मोठा पदाधिकारी लावला गळाला
उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी ; भाजप चा मोठा पदाधिकारी लावला गळाला
पुरेसिल्लोड / नवप्रहार डेस्क
निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली आहे. पक्षाची ताकद कशी वाढवता येईल याच्या प्रयत्नात सगळेच पक्ष आहेत. यातच उद्धव ठाकरे यांनी मोठी खेळी खेळत भाजप चा मोठा पदाधिकारी गळाला लावला आहे. भाजपा प्रदेश चिटणीस आणि मागील दोन विधानसभेचे उमेदवार राहिलेल्या नेत्याचा पक्ष प्रवेश निश्चित केला आहे.
यानुसार भाजपा नेते सुरेश बनकर स्थानिक शेकडो कार्यकर्त्यांसहित उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी शिवबंधन बांधणार आहेत. यासाठी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून तब्बल २०० गाड्यांचा ताफ्यासह शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. यामध्ये भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी, १०३ बूथ प्रमुख, ११५ शक्ती प्रमुख, शेकडो पन्ना प्रमुख यांचा समावेश आहे. सत्तारांना शह देण्यासाठी ठाकरेसेनेने थेट भाजपाचा राज्यस्तरीय नेता पक्षात घेत मोठे नियोजन केल्याची चर्चा जोर धरत आहे.
सिल्लोड विधानसभा मतदार संघ हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ होता. मात्र २०१९ मध्ये अब्दुल सत्तार यांनी शिवबंधन बांधले होते. त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटली. यावेळी सुद्धा अब्दुल सत्तार यांना शिंदे गटाकडून तिकीट पक्के मानले जात आहे. भाजप-सेना युती असल्याने ही जागा भाजपला सुटू शकत नाही. यामुळे भाजपचे नेते सुरेश बनकर यांनी उबाठा गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने घडामोडींनी वेग घेतला आहे. सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील जवळपास सर्वच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सुरेश बनकर यांच्या मागे उभे असल्याचे दिसते.
लोकसभेत पराभव, स्थानिक भाजपाचा वाढला विरोध
जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे उमेदवारांचे काम न केल्याने सिल्लोडमधून लीड मिळाली नव्हती, यामुळेच रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्याचा आरोप भाजपामधून होत आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सुरेश बनकर यांना पाठबळ देत असल्याचे बोलले जात आहे. अब्दुल सत्तार विरुद्ध रावसाहेब दानवे हा वाद आता विकोपाला गेला असून सत्तार यांना मात देण्यासाठी दानवे यांनी बनकर यांना ठाकरेसेनेत पाठविण्याची खेळी खेळल्याची चर्चा आहे. मात्र, मुरब्बी राजकारणी मंत्री अब्दुल सत्तार आता कोणता पत्ता खेळतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सत्तारांचा विजयी रथ रोखणार का?
गेल्या १५ वर्षांपासून सिल्लोड विधानसभा मतदार संघातून अब्दुल सत्तार तीन वेळा निवडून आले आहेत. २००९ व २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर तर २०१९ मध्ये शिवसेना (उद्धव गट) कडून असे तीन वेळा सत्तार विधानसभेत गेले आहेत. त्यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर, २००९ व २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार सुरेश बनकर यांचा पराभव केला होता. आता यावेळी ते चौथ्यांदा निवडून येतात की त्यांचा विजयी रथ रोखण्यात ही रणनीती कामी येते हे आगामी काळात दिसणार आहे.